कोल्हापूर, ता. 24 – कोरोना लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरातील सर्व सराफ दुकाने कोणत्याही परिस्थितीत सोमवारी (ता. 28) सुरू करणार असल्याची माहिती कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी दिली.
ते म्हणाले, कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट सध्या कमी होत आहे. पुढील तीन दिवसांमध्ये तो आणखी कमी होईल असे वाटते. शासनाचे निर्बंध, नियमांचे पालन करण्याबरोबरच मास्क, सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतर करून सोमवारपासून सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत दुकाने सुरू असतील. ग्राहकांनीही वरील सर्व गोष्टींचे पालन करावे.
सोमवारीच रक्तदान शिबिराचे आयोजन-दरम्यान, सोमवारीच कोल्हापूर सराफ व्यापारी संघ व धंद्यात तेजी-मंदी ग्रुपच्या वतीने संघाच्या महाद्वार रोड येथील इमारतीमध्ये चौथ्या मजल्यावर सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. संघाच्या सभासदांबरोबरच इतरांनीही मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहनही श्री. गायकवाड यांनी यावेळी केले.