कोल्हापूर, दि. 23 : संबंधित वाड्या-वस्त्या, गावांना, रस्त्यांची जातीवाचक नावे बदलुन महापुरूषांची व लोकशाही मूल्यांशी निगडीत नावे देताना कोणत्याही प्रकारचा वाद उद्भऊ नये यासाठी शासन स्तरावर ज्या महापुरूषांची जयंती साजरी केली जाते अशाच महापुरूषांची नावे देण्यात यावीत जेणेकरून सामाजिक सलोखा व सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वृध्दींगत होईल. याबाबत माहिती गोळा करण्यात यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत दसाई यांनी केली.
जातीवाचक नावांऐवजी महापुरूषांची व लोकशाही मूल्यांशी निगडीत नावे देण्यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आज पार पडली यावेळी ते बोलत होते.
या बैठकीला पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, महानगरपालिका शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, समाज कल्याण आयुक्त विशाल लोंढे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी दिपक घाटे, जिल्हा प्रशासन अधिकारी दिपक पाटील आदी उपस्थित होते.
प्रारंभी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.अजयकुमार माने यांनी एखाद्या वस्तीचे वा रस्त्याचे नाव जातीवाचक नाव बदलावयाचे असल्यास, त्या अनुषंगाने संबंधीत गावाने तसा ठराव पास करून त्याबाबतचा प्रस्ताव संबंधीत गट विकास अधिकारी यांच्याकडे सादर करून गट विकास अधिकारी यांनी सदर प्रस्ताव तपासुन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठवावा. त्यांनी विभागीय आयुक्त यांच्यामार्फत प्रस्ताव शासनाच्या मान्यतेस्तव पाठविल्यानंतर शासन स्तरावर प्रस्तावाची तपासणी करून मंत्री महोदयांच्या मान्यतेने त्यावर आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती दिली. त्यावर सध्या कोविड-19 या महामारीच्या पार्श्वभूमीवर ग्रामसभा होत नसल्याने सध्याच्या काळात किती नावे बदलता येतील याची माहीती गोळा करण्यात यावी अशी सूचना जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी केली.
तत्पूर्वी या बैठकीमध्ये गट विकास अधिकारी व नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांनी बहुतांशी बाबींमध्ये कागदोपत्री जातीवाचक नावे आढळून येत नसल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर, अशा प्रकरणांमधील माहिती गोळा करून संबंधित विभागांना पाठवावी व त्यावर शासनाकडून मार्गदर्शन मागविण्यात यावे, असेही जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी सूचित केले. या बैठकीसाठी जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी व नगरपालिकांचे मुख्याधिकारी ऑनलाईन माध्यमातून उपस्थित होते.