जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय
कोल्हापूर, दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय) : कोल्हापूर महानगरपालिका व कोल्हापूर महानगर विकास प्राधिकरण क्षेत्र याचे एक युनिट धरुन येथील सर्व प्रकारची दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी मिळण्यासाठी आज व्यापारी संघटनेने जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे. सर्व दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्याबाबत व्यापारी संघटनेच्या मागणीच्या प्रस्तावावर राज्य शासन स्तरावर निर्णय घेण्यासाठी हा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभागाच्या प्रधान सचिवांकडे पाठविण्यात येईल, असा निर्णय आज जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला. याबाबत राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत योग्य तो निर्णय घेण्यात येईल त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल. दरम्यानच्या कालावधीत राज्य शासनाने बंदी आदेशाबाबत घेतलेला निर्णय सर्व जिल्ह्यांना सारखाच लागू आहे. स्तर 4 चे निर्बंध कोल्हापुर प्रमाणे इतर 6 जिल्ह्यांनाही लागू असल्याने त्याचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यामुळे बंदी आदेशांचे उल्लंघन केल्यास किंवा उल्लंघन करण्यास प्रोत्साहन दिल्यास साथ रोग नियंत्रण कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
यावेळी महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी तसेच अन्य सदस्य उपस्थित होते.
कोल्हापूर महानगरपालिका व कोल्हापूर महानगर विकास प्राधिकरण क्षेत्र याचे एक युनिट धरून सर्व प्रकारची दुकाने उघडण्यास परवानगी मिळण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडे व्यापारी संघटनेने निवेदन दिले आहे. या पार्श्वभूमीवर याबाबत निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृष्टी प्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली.
जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्राची लोकसंख्या, मागील दहा दिवसांत झालेल्या आरटीपीसीआर चाचण्या तसेच या भागाचा बाधित दर आदी माहिती महानगरपालिकेने सादर करावी, जेणेकरून ही माहिती या प्रस्तावासोबत राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभागाला सादर करता येईल. प्राधिकरणातील गावांची माहिती देखील तयार ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी यावेळी दिल्या.
पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे व निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी व्यापारी संघटनेच्या मागण्यांबाबत बैठकीत माहिती दिली.