कोल्हापूर, दि. 1 (जिल्हा माहिती कार्यालय): कोरोना संकटामुळे यावर्षी सर्वधर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. यावर्षी सालाबादप्रमाणे गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. गणेशोत्सव कालावधीत भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी होण्याची शक्यता आहे. कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष दौलत देसाई यांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
१)सार्वजनिक गणेशोत्सवा साठी गणेशोत्सव मंडळांनी महानगरपालिका/स्थानिक प्रशासन यांची त्यांच्या धोरणानुसार पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील.
२)कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाच्या मंडपाबाबतचे धोरण यांच्याशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत. यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींची सजावट करताना त्यात भपकेबाजी नसावी.
३)श्री गणेशाची मुर्ती सार्वजनिक मंडळाकरीता 4 फुट व घरगुती गणपतीकरिता 2 फुटांच्या मर्यादेत असावी.
४) या वर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमुर्ती ऐजवी घरातील धातू/संगमरवर आदी मुर्तीचे पूजन करावे. मुर्ती शाडूची/पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रीम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यात यावे.
५)उत्सवाकरीता वर्गणी, देणगी स्वेच्छेने दिल्यास त्याचा स्विकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी .
६)सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम, शिबीरे (उदा.रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याव्दारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ.आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी.
७) लागू करण्यात आलेले Level of Restrictions for Breaking the Chain बाबत वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार इतर निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये गणेशोत्सवानिमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही.
८)आरती, भजन, किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतुदींचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.
९) श्री गणेशाच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीव्दारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत- जास्त व्यवस्था करण्यात यावी.
१०) गणपती मंडपांमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रिनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणा-या भाविकांसाठी शारिरीक अंतराचे (फिजीकल डिस्टंसिंग) तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क,सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.
११)श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पध्दतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील, इमारतीतील सर्व घरगुती गणेशमुर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नयेत.
१२)महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने गणेशमुर्तींच्या विसर्जंनाकरिता कृत्रीम तलावांची निर्मिती करण्यात यावी.
१३)कोवीड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सुचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.