कोल्हापूर : श्री शनेश्वर मंदिरातील ऐतिहासिक वड-पिंपळाचे वृक्ष तोडण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी शनिवार पेठ परिसरातील नागरिकांनी केली आहे. याबाबतचे निवेदन महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना देण्यात आले आहे. यावेळी परिसरातील नागरिकांनी आपली बाजू प्रशासनासमोर मांडली.
शनिवार पेठेतील श्री शनेश्वर मंदिरामध्ये सुमारे १५० ते २०० वर्षांपूर्वीचे अंदाजे १५० फुटांचा परिसर व्यापलेले ऐतिहासिक वड-पिंपळ एकत्र असलेला वृक्ष आहे. हे मंदिर परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असून, वटपौर्णिमेची अनेक वर्षांपासूनची परंपरा इथे आहे. या ऐतिहासिक वड-पिंपळाच्या वृक्षावर अनेक पक्ष्यांची घरटी असून, या पक्ष्यांचा जीव आणि आश्रयस्थान धोक्यात येणार आहे. या एकत्र असलेल्या वड-पिंपळ वृक्षाचा भागातील नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा धोका नाही. सध्याची परिस्थिती पाहता कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून, आॅक्सिजनची कमतरता सर्वत्र जाणवत आहे. आॅक्सिजन वाढवण्याचे काम वड-पिंपळाचे वृक्ष मोठ्या प्रमाणात करतात. त्यामुळे वृक्ष तोडण्यास कोणत्याही प्रकारची परवानगी देऊ नये. वृक्ष तोडण्याची परवानगी दिल्यास भागातील नागरिकांचा मोठा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा ही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
यावेळी परिसरातील सुनील करंबे, सुधीर सूर्यवंशी, रोहन जाधव, अॅड. भगवान पवार, राजू करंबे, दिग्विजय कालेकर, विजय पंजे, राजू पाटील, मारुती वैद्य, सविता सूर्यवंशी, मीनाक्षी मुधाळे, अंजली बल्लाळ, अश्विनी जांभळे, इर्शाद इनामदार, सरोजिनी पळसुले, किरण सूर्यवंशी आदी उपस्थित होते.