*सीसीटीव्ही कॅमे-यामुळे गुन्हेगारीवर वचक…….*
*ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन……..*
*कागलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा प्रकल्पाचे लोकार्पण……..*
कागल,दि. १८:सीसीटीव्ही कॅमेरे पोलिस प्रशासनाच्या कामकाजात उपयोगी ठरतात. त्यामुळे गुन्हेगारीवर वचक बसतो, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कागल शहराच्या सीसीटीव्ही कॅमेरा उपक्रमाच्या लोकार्पण कार्यक्रमात मंत्री श्री. मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. संपूर्ण कागल शहरभर आयसीआयसीआय बँकेच्या सहयोगातून ध्वनियंत्रणेसह सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.
*भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, गुन्हेगार कितीही मोठा असला तरीही त्याला शिक्षा झालीच पाहिजे. आगीला हात लावला की भाजलंच पाहिजे, असे पोलिसांचे काम असले पाहिजे. गुन्हेगाराला जर वेळीच चाप लागला नाही तर तो मोठा गुन्हेगार होईल. म्हणूनच, ज्या -त्या गुन्ह्याची शिक्षा ज्या- त्या वेळेलाच झाली पाहिजे. आजघडीला प्रत्येकाकडे मोबाईल आहे, त्याचा गैरवापर झाल्यास गुन्हेगारी वाढते. त्यामुळे पोलिसांचा योग्य वचक असलाच पाहिजे.जिल्हा पोलीस प्रमुख शैलेंद्र बलकवडे म्हणाले, कागल शहराची भौगोलिक रचनाच अशी आहे की, राष्ट्रीय महामार्गालगत, एका बाजूला कोल्हापूर हे मोठे शहर तर दुसऱ्या बाजूला कर्नाटकातल्या बेळगाव जिल्ह्याची सीमा. त्यामुळे कागल नगरपालिका आणि कागल पोलीस स्टेशनने तंत्रज्ञानात टाकलेले हे पाऊल कौतुकास्पद आहे. सीसीटीव्ही कॅमे-यांचे सामाजिक सुरक्षेत योगदान वाढेल. पोलीस प्रशासनातील मनुष्यबळाचा विचार करता सीसीटीव्ही कॅमे-यामुळे तंत्रज्ञानात भर पडली व साहजिकच कामाचा चांगला उठाव होईल.कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक भैय्या माने, आयसीआयसीआय बँकेचे रिजनल हेड विकास देशमुख, जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी मनोगत व्यक्त केले.*
कार्यक्रमास नगराध्यक्षा सौ. माणिक माळी, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी, नगरसेवक चंद्रकांत गवळी, उपनगराध्यक्ष बाबासो नाईक, जयंत पाटील – कासारीकर, नितीन दिंडे, सौरभ पाटील, सतीश घाडगे, आनंदा पसारे, माधवी मोरबाळे, अजित कांबळे, इरफान मुजावर, अस्लम शेख, आयसीआयसीआय बँकेचे श्री. स्वामी, मुख्याधिकारी टीना गवळी, ॲड. संग्राम गुरव, संग्राम लाड यांच्यासह नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.स्वागत व प्रास्ताविक प्रवीण काळबर यांनी केले.कागलचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी आभार मानले.