कोल्हापूर दि. 20 (जिल्हा माहिती कार्यालय): भारतीय हवामान वेधशाळेने 20 जुलै 2021 रोजी ऑरेंज अलर्ट, 21 व 22 जुलै 2021 या दिवसांकरिता रेड अलर्ट व 23 जुलै 2021 करिता ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. या कालावधीमध्ये अति पाऊसमान ( प्रतिदिन 70 ते 150 मि.मी. किंवा त्याहून जास्त) होण्याची शक्यता आहे. विशेषत: जिल्हयातील चंदगड, आजरा, राधानगरी, शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा, भुदरगड या तालुक्यातील नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
अंदाजित पाऊसमानानुसार नदी पात्रातील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच डोंगराळ भागामध्ये भूस्खलन अथवा दरडी कोसळणे अथवा गावठाणातील जुन्या घरांची पडझड होणे या सारख्या घटना संभावत असल्याने जिल्हयातील नागरीकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.