कोल्हापूरः ता.२१.कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) उत्पादक व ग्राहकांचा विश्वास संपादन करून त्यांना जास्तीत जास्त लाभ करून देण्यासाठी नेहमीच प्रयत्न केलेला आहे. त्यामुळेच गोकुळच्या दररोजच्या दूध संकलनात तसेच विक्रीत सातत्याने वाढ होत आहे. यावर्षी गोकुळने एक दिवसाच्या दूध विक्रीचा नविन उच्चांक प्रस्तापीत करतांना १५लाख २५ हजार लिटर्स इतकी दूध विक्री एक दिवसात केलेली आहे. गतवर्षी याच दिवशी म्हणजे ईद च्या दिवशी १२ लाख ६२ हजार लिटर्स इतकी दूध विक्री गोकुळने एक दिवसात केलेली होती. गतवर्षीच्या तुलनेत गोकुळच्या विक्रीत जवळजवळ २लाख६३हजार लिटर्स ने वाढ झालेली आहे. अशी माहिती संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांनी दिलेली आहे. या कौतुकास्पद कामगिरी बद्दल जिल्हाचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व जिल्ह्याचे पालक मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी गोकुळ व्यवस्थानाचे अभिनंदन केले. पुढे बोलताना चेअरमन विश्वास पाटील यांनी विक्रीमध्ये नविन मानदंड प्रस्तापीत करतांना गोकुळने नेहमीच चढता आलेख ठेवलेला आहे. गोकुळने दिवसाला २० लाख लिटर्स दूध संकलन व तीतकीच विक्री करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले असून हे उद्दिष्ट गोकुळ दूध उत्पादक व ग्राहकांच्या विश्वासहार्ततेवर साध्य करू असा विश्वास चेअरमन विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. या यशामध्ये गोकुळचे दूधउत्पादक,दुधसंस्था ग्राहक वितरक व कर्मचारी यांचे योगदान मोलाचे असल्यामुळे ते कौतुकास पात्र आहेत. म्हणून मी त्यांना संचालक मंडळाच्यावतीने धन्यवाद देतो. असे चेअरमन श्री. पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच चेअरमन विश्वास पाटील यांनी गोकुळ परिवाराच्या वतीने मुस्लीम बांधवाना ईदच्या शुभेच्छा दिल्या