उदगीर_ प्रेमाचा मार्ग खडतर आहे. प्रेमात हृदयाची देवाण- घेवाण करा पण हृदयावर कब्जा होऊ देऊ नका. प्रेमात अधिक नाजूक बनणे धोकादायक असते. या सर्वांची कारणे सांगतानाच प्रेमाचे महत्व विषद करत प्रेमाचे रहस्य उलगडणारी साहित्यकृती म्हणजे प्राॅफेट हि होय असे मत प्रा. मिर्झा वाहिदअली यांनी व्यक्त केले.
कचरूलाल मुंदडा यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या चला कवितेच्या बनात या चळवळी अंतर्गतच्या २४५ व्या वाचक संवाद मध्ये प्रा.वाहेदअली मिर्झा यांनी खलील जिब्रान लिखित प्राॅफेट या साहित्य कृतीवर संवाद साधताना पुढे म्हणाले की प्रेम माणसाला राजाही बनवतो आणि सुळीवरही चढवतो. प्रेमाला फक्त प्रेमच हवं असतं. विण्याला अनेक तार असून ते एकटेएकटेच राहतात तरीपण त्यांचे सूर मात्र एकत्रित निघतात,तद्वतच आपणही राहिले पाहिजे. विवाहानंतर एकत्र राहणे म्हणजे चिटकून राहणे नव्हे. तुमची मुलं-मुली ही कामुक इच्छेची परिणीती आहेत.ते तुमच्या द्वारे येतात पण तुमच्या पासून नाही. तुम्ही त्यांच्या कायेला निवारा देऊ शकता पण त्यांच्या आत्म्याला नाही. पितापुत्र यांचे नाते हे धनुष्य आणि बाणासारखे आहे असे अनेक उदाहरणे देत सुंदर विवेचन केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्षात व फेसबुक लाईव्ह संपन्न झालेल्या या संवादानंतरच्या चर्चेत मुरलीधर जाधव, प्रा.गोपाळ पाटील, मोहन निडवंचे, शांताबाई गिरबणे यांचेसह अनेकांनी सहभाग नोंदवला. यावेळी मान्यवरांचा ग्रंथभेट व सन्मान चिन्ह देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. उपस्थितांना जनमदिनाची ग्रंथ भेट देण्यात आली. शेवटी कचरूलाल मुंदडा यांनी यथोचित अध्यक्षीय समारोप केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुरलीधर जाधव यांनी केले तर आभार प्रा.गोपाळ पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी संयोजक अनंत कदम, राजपाल पाटील आदिंनी परिश्रम घेतले.