कोल्हापूर दि.२३ राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील कर्मचा-यांच्या न्याय मागण्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाकडे गेली तीन वर्षापासून प्रलंबित आहेत. याविषया संदर्भात मंत्री उदय सामंत यांच्या सोबत आंदोलनाबाबत १५/१२/२०२१ रोजी प्रत्यक्ष व १६/१२/२०२१ रोजी ऑनलाईन बैठकीत चर्चा होऊनसुद्धा ठोस निर्णय झालेला नाही. आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीच्यावतीने गेल्या पाच दिवसांपासून शिवाजी विद्यापीठामध्ये धरणे आंदोलन सुरु आहे. आज या आंदोलनाच्या ठिकाणी भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी भेट देऊन आंदोलकांच्या मागण्या, आंदोलनाची भूमिका याची माहिती घेऊन निवेदन स्वीकारले.
सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे रद्द केलेले शासन निर्णय पुनर्जीवित करणे, अकृषी विद्यापीठातील ७९६ राहिलेल्या पदांना सातवा वेतन आयोग लागू करणे, ५८ महिन्याच्या वेतन फरकासह मिळावी, ७ मी २०२१ चा शासन निर्णय सुधारित करून पदोन्नतीमधील ३३ टक्के आरक्षणाची पदे सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून भरण्यात यावी यासह १३ विविध मागण्या असून सक्षम विरोधी पक्ष म्हणून या मागण्या सोडवण्यासाठी आपण शासन स्तरावर प्रयत्न करावेत अशी विनंती यावेळी आंदोलनकर्त्यांच्यावतीने करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी यासंदर्भातील आंदोलक समितीची भूमिका समजून घेत महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीच्यावतीने मागण्यांचे निवेदन शासन स्तरावर मांडण्यासाठी त्या पूर्ण होणेसाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून मुंबई येथे सुरु असणाऱ्या अधिवेशनामध्ये या विषयासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन याप्रसंगी आंदोलनकर्त्यांना देण्यात आले.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.