मुंबई : सोनी मराठी वाहिनीवरील गाथा नवनाथांची या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत . या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना पौराणिक कथांचा उलगडा होत आहे .या मालिकेत आतापर्यंत नाथांच्या चार अवतारांच्या गोष्टींचे कथन केले आहे . या मालिकेतून नवनाथांचा महिमा महाराष्ट्राच्या घर घरात पोहचत आहे. मच्छिन्द्रनाथ ,गोरक्षनाथ , जालंदरनाथ , आणि गहिनीनाथ या नाथांच्या कधीच माहिती नसलेल्या व कधीच न बघितलेल्या गोष्टी प्रेक्षक अनुभवत आहेत . या मालिकेचे नुकतेच २०० भाग पूर्ण झाले आहेत .
गोरक्षनाथ आणि मच्छिन्द्रनाथ यांच्या गुरुशिष्याच्या गोष्टी प्रसिद्ध आहेत. त्यानात्याला पुढे घेऊन जात आता गोरक्षनाथ त्यांच्या हातून अवतार घेतलेल्या गहिनीला दीक्षा देणार आहेत. मैनावतीच्या राज्यात अडकलेल्या आपल्या गुरूपर्यंत गोरक्षनाथ कसे पोचणार, तिच्या तावडीतून ते आपल्या गुरूला बाहेर काढून जगत्कल्याणाच्या कार्याला दिशा देऊ शकतील का, हे येत्या काही भागांत पाहायला मिळणार आहे. हत्तीच्या कानातून प्रकट झालेल्या कानिफनाथ यांची आणि मच्छिन्द्रनाथ आणि मैनावतीचे सुपुत्र मीननाथ यांची गोष्ट पुढील भागांत प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे