कोल्हापूर, ता. १४ – पेठवडगाव येथील कुमारी किरण दिलीप राठोड (वय २५) रविवारी दीक्षा घेणार आहे. त्याला अनुसरून इतर धार्मिक विधींना आजपासून सुरवात झाली.
वडील सराफ व्यावसायिक, आई गृहिणी, भाऊ चार्टर्ड अकौंटंट आणि विवाहित बहीण अशा सुखवस्तू कुटुंबात जन्म घेतलेल्या किरणने बीकॉमपर्यंतचे शिक्षण घेऊन ऐषोआरामाचे जीवन जगण्याचे न ठरविता दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आणि त्याला कुटुंबाने संमती देऊन त्या विधीची सुरवात बुधवारी सकाळी ८.३० प्रभू जन्मोत्सव आणि सायंकाळी सात वाजता गीत गायनाने झाली. आज सकाळी आठ वाजता श्री वीर प्रभू का जन्मकल्याण होऊन त्यानंतर महावीर जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी सात वाजता मुनि तारा दर्शन थी दुःख जाये हा कार्यक्रम झाला.
शुक्रवारी शिरोली येथील सीमंधर धाम येथे सकाळी ७.३० वाजता पू. गुरुभगवंतांचे आगमन होईल. ८.३० वाजता आत्मशुद्धि हेतू महाभिषेक होईल. दुपारी २.३० वाजता रंगोत्सव, छाब वधामणा, महेंदी गांव सांझी या कार्यक्रमाबरोबरच सायंकाळी ७.३० विदाई समारोहचे आयोजन केले आहे.
शनिवारी सकाळी जोगी थवे न जाए महावीर या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सायंकाळी ६.३० वाजता महाआरती होईल. रविवारी रागसे वितराग की ओर म्हणजे दीक्षा विधी होईल. ही दीक्षा प.पू. आचार्य श्रीमद विजय विमलबोधी सुरीश्वर महाराज प्रदान करतील. किरणच्या गुरू प.पू. साध्वी दर्शनप्रभाश्री आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.