संघर्षाच्या आणि जखमांच्या खुणा लेऊन उभा असलेला हा शीर नसलेला नाईकी देवतेचा पुतळा इथे १२ मीटर स्तंभाच्या स्वरूपात आहे. या स्मारकाच्या तळापासून मॉंटे कॅसिनो टेकडी पूर्णपणे पाहता येते. मॉंटे कॅसिनोच्याभावतीने दोन मीटरचा पादचारी मार्ग खोदण्यात आला आहे, तसेच तेथे युद्धात सहभागी झालेल्या पाच पोलिश युनिट्सची प्रतिके, पोलिश गरूड आणि या युद्धवीरांची रक्षा असलेला कलश येथे ठेवण्यात आला आहे.
त्याजवळच एक फलक लावलेला आहे, हा फलक म्हणजेही एक स्मारकच आहे, “कृतज्ञतेचे स्मारक.’ १९४२ मध्ये सोविएत युनियनच्या तावडीतून अँडर्स आर्मीबरोबर पलायन केलेले ५००० पोलिश निर्वासितांना भारतात आश्रय मिळाला होता.
या निर्वासितांचे १९४२-४८ या काळात पुनर्वसन करण्यात कोल्हापूरच्या राजघराण्याचे महत्वाचे योगदान होते आणि त्यानंतर २०१९मध्ये कोल्हापूरचे युवराज आणि युवराज्ञी यांच्या पुढाकाराने त्या काळात वळीवडे येथे राहून गेलेल्यांपैकी काही जणांनी तेथे भेटही दिली होती.
राजघराण्याप्रती असलेली कृतज्ञता आणि त्यांचा सन्मान म्हणून युवराज आणि युवराज्ञी यांना ब्रिगे. जन. टोमीझ डोमिनीकोवस्की यांच्या नेतृत्वाखालील पोलिश लष्कराच्या वॉर्सा गॅरिसनने गार्ड ऑफ ऑनर दिले. त्यांनी पोलिश रिवाजानुसार तेथे पुष्पचक्र वाहिले आणि वळीवडे छावणीत लहानपण व्यतीत केलेल्या, पण आता वृद्धत्वाकडे झुकलेल्या पोलिश नागरिकांनी त्यांच्या त्या काळातील आठवणी सांगितल्या आणि कोल्हापूरचे राजघराणे तसेच भारतीय लोकांचे आभार मानले.
त्यानंतर त्यांनी ओशोटा येथील गुड महाराजा चौकाला भेट दिली, तेथे त्यांचे ओशोटा जिल्ह्याच्या महापौर श्रीमती डोरोटा स्टेजिएन्का आणि जॅनुझ कोरझॅक लॅसिएम स्कूलचे प्राचार्य तसेच शिक्षकांनी स्वागत केले, या स्मारकाची देखभाल करण्याची जबाबदारी या शाळेची आहे.
“आझादी का अमृत महोत्सवा’च्या निमित्ताने हे कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल पोलंडमधील भारताच्या राजदूत नग्मा मलिक आणि भारतीय दूतावासातील त्यांच्या सहकार्यांचे मनापासून आभार.