कसबा सांगाव, दि. १२: कागल विधानसभा मतदारसंघातील गावे, वाड्यावस्त्यांसह प्रकल्पग्रस्त वसाहतींचा विकासही मोठ्या ताकतीने केला, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. धरणांच्या बांधकामासाठी घरेदारे, शेतीवाडी त्याग केलेले प्रकल्पग्रस्तच समृद्धीचे खरे शिल्पकार आहेत, असेही ते म्हणाले.
कसबा सांगाव येथील वाकी व वाडदे वसाहतीमध्ये बांधकाम कामगारांना सुरक्षा व अत्यावश्यक साहित्य संस्थेचे वाटप, तसेच अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन अशा कार्यक्रमात श्री. मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
भाषणात आमदार श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, आयुष्यभर गरीब व सामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून विकास त्यांच्यापर्यंत पोहोचवला.
*”नव्या सरकारकडून अपेक्षा…..”*
श्री. मुश्रीफ म्हणाले, नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानाचा संकल्प महाविकास आघाडी सरकारने केला होता. राज्यात कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे तो लांबणीवर पडला. दरम्यान; गेल्या एक जुलै रोजी माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या स्मृतिदिनी हे अनुदान शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला. त्यातील त्रुटीही दूर केल्या आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी राज्यातील नव्या सरकारने करावी, असेही ते म्हणाले.
केडीसीसीचे संचालक प्रताप उर्फ भैया माने म्हणाले, धरणग्रस्त हे आपली भावंड आहेत. आमदार हसन मुश्रीफ हे सदैव त्यांच्या पाठीशी हिमालयासारखे उभे आहेत. त्यांची पुनर्वसन आणि त्यांचा विकास करताना त्यांनी कधीही दुजाभाव केलेला नाही.
पी. डी. आवळे म्हणाले, देशात सर्वत्र तालिबानी राजवटीसारखी परिस्थिती आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान राहील की नाही, अशी चिंता वाटावी अशी परिस्थिती आहे.
यावेळी कै. आनंदराव जाधव विकास सेवा संस्थेच्या नूतन संचालकांचा सत्कार झाला. तसेच मोहन कांबळे यांनी पीएच. डी. पदवी मिळवल्याबद्दल व पी. डी. आवळे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाले.
केडीसीसीचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, वासुदेव पाटील, राजेंद्र माने, पी. डी. आवळे, भगवान आवळे आदी प्रमुखांची भाषणे झाली.
व्यासपीठावर विठ्ठल चव्हाण, के. एस. पाटील, प्रभाकर थोरात, सौ. विद्या शिवाजी पाटील, अमोल माळी, मारुती पाटील, महादेव केसरकर, सौ. वैशाली कुंभार, पी. डी. आवळे, अण्णासाहेब कांबळे, सौ. रुक्मिणी पाटील, मोहन कांबळे आदी प्रमुख उपस्थित होते.