कोल्हापूर, दि. 12: गेले दोन आठवडे जिल्ह्यात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचबरोबर धरण क्षेत्रातील पाणी पातळीत वाढ झालेली दिसून येत आहे. सद्यस्थितीत सुरक्षिततेच्या दृष्टीने नागरिकांनी वर्षा सहलीला, ट्रेकिंगला जाणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
सद्यस्थितीत भारतीय हवामान खात्याने कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या कालावधीत जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यातील धबधबे व अन्य वर्षा पर्यटन स्थळांच्या ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होताना दिसत आहे. याच कालावधीत जिल्ह्यातील बऱ्याच संघटना पन्हाळा ते पावनखिंड -विशाळगड अशा मार्गावर जंगल सफर आणि ट्रेकिंगच्या मोहिमा आयोजित करत आहेत. अशा स्वरुपाच्या मोहिमा, ट्रेकिंग मध्ये सहभाग घेत असताना अतिवृष्टीमुळे या मार्गावर भूस्खलन, दरड कोसळणे किंवा पूरस्थिती निर्माण होणे अशा स्वरूपाच्या घटना घडू शकतात.
यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे, की अतिवृष्टी कालावधीत अशा स्वरूपाच्या मोहिमा आयोजित करू नयेत. जिल्ह्यातील नागरिकांनीही अशा स्वरूपाच्या मोहिमांमध्ये सद्यस्थितीत सहभाग नोंदवू नये.