कोल्हापूर, दि. 26 : कोल्हापूर सारख्या पुरोगामी विचारांच्या जिल्ह्यात बालविवाह होताना निदर्शनास येणे, ही अत्यंत गंभीर बाब आहे. जिल्ह्यातील गावांमध्ये बालविवाह झाल्याचे आढळून आल्यास गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना पदावरुन काढून टाकण्याची तर ग्रामसेवकांच्या निलंबनाची कारवाई करण्यात येईल तसेच शहरात बालविवाह आढळून आल्यास वॉर्ड स्तरीय समिती अध्यक्ष व सदस्यांवर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा बाल संरक्षण समितीची बैठक जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली झाली, ते बोलत होते. यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील व संबंधित समिती सदस्य उपस्थित होते.
बालसरंक्षण समितीचे अध्यक्ष व सदस्यांकडून बालविवाह प्रतिबंध अधिनियमाची अंमलबजावणी करण्यात कसूर झाल्यास समिती सदस्यांना जबाबदार धरुन पदावरुन काढून टाकण्याची अथवा निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिला.
तालुका बाल संरक्षण समित्या सक्षम होण्यासाठी तहसीलदारांनी बाल विवाह व अन्य संबंधित विषयांवर दरमहा नियमित आढावा घ्यावा, असे सांगून याकामी हलगर्जीपणा झाल्यास संबंधित समिती सदस्यांना जबाबदार धरुन कडक कारवाई करण्यात येईल, असेही निर्देश त्यांनी दिले.
बालविवाह प्रतिबंध अधिनियमानुसार २१ वर्षांखालील मुलगा व १८ वर्षांखालील मुलीचा विवाह करणे गुन्हा आहे, तसेच बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) अधिनियमानुसार बाल विवाह होत असलेले बालक हे काळजी आणि संरक्षणाची गरज असलेले बालक आहे, असे नमूद करण्यात आले आहे. बालकांचे हक्क व सरंक्षणासाठी ग्रामस्तरावर विविध प्रतिबंधात्मक तसेच उपचारात्मक उपाययोजना करणे, ही ग्राम बाल संरक्षण समितीची जबाबदारी आहे. बालविवाह प्रतिबंधक अधिनियमानुसार ग्रामसेवकांना ग्रामपंचायत क्षेत्रात बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. यानुसार गावात बालविवाह कायद्याबाबत जनजागृती करणे, बालविवाह होत असल्यास तो वेळीच रोखणे व बालविवाह झाल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबत कायदेशीर कारवाई करण्याबाबत ग्रामसेवकांनी आपले कर्तव्य बजावावे, असे महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील यांनी सांगितले.
00000
उद्या कोल्हापूरात उज्ज्वल भारत- उज्ज्वल भविष्य महोत्सव
कोल्हापूर, दि. 26 (जिल्हा माहिती कार्यालय) : आजादी का अमृतमहोत्सवातंर्गत केंद्रीय ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल भारत- उज्ज्वल भविष्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यात ऊर्जा मंत्रालय, महावितरण, महापारेषण, महानिर्मिती व इतर भागिदार यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य शासनाच्या दि. 25 ते 30 जुलै 2022 या कालावधीत हा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सवात ऊर्जा क्षेत्रातील कामगिरीचा मागोवा घेऊन ऊर्जेचे भविष्यकालीन 2047 पर्यंतचे नियोजनाचा वेध घेण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवार दि.27 जुलै रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कोल्हापूर जिल्ह्यात दि.27 जुलै रोजी दोन ठिकाणी विशेष कार्यक्रम होणार आहेत. सकाळी 9 वाजता. भारतरत्न डॉ.एस.विश्वेश्वरय्या मेमोरियल हॉल, ताराबाई पार्क, कोल्हापूर व दुपारी 12.00 वाजता. श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे नाट्यगृह, इचलकरंजी येथे कार्यक्रम आयोजित केला आहे. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.डी.टी.शिर्के, जिल्हाधिकारी. राहूल रेखावार मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, महापालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मुख्य अभियंता परेश भागवत, आरजीपीपीएल एनटीपीसी सहाय्यक महाव्यवस्थापक डी सुरेश यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
गत आठ वर्षातील केंद्र व राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाच्या सौभाग्य, दीनदयाल ग्रामज्योती, एकात्मिक ऊर्जा विकास, प्रधानमंत्री कुसुम, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश ,मुख्यमंत्री सौर कृषिपंप, उच्चदाब वितरण प्रणाली-कृषीपंपाना वीजपुरवठा, कृषिपंप वीज जोडणी धोरण-2020, जिल्हा नियोजन व विकास समिती निधी इ. योजनांच्या माध्यमातून ऊर्जा क्षेत्रातील विकास कार्यक्रम, ग्राहकाधिकार बाबत या महोत्सवात पोस्टर्स, चित्रफिती, पथनाट्याव्दारे जनजागृती केली जाणार आहे. विविध योजनांच्या निवडक लाभार्थ्यांशी संवाद साधून त्यांचा सन्मान कार्यक्रमात केला जाणार आहे. या महोत्सवात सहभागाचे आवाहन नोडल अधिकारी तथा अधीक्षक अभियंता अंकुर कावळे यांनी केले आहे.