मुंबई ,: – हंगामा प्ले या हंगामा डिजिटल मीडियाच्या मालकीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मने नवी हिंदी अँथॉलॉजी – तेरा छलावा लाँच केली आहे. ‘तेरा छलावा’ ही एक क्राइम थ्रिलर असून त्यामध्ये या क्षेत्रातील कविता कौशिक, संदीपा धर, अन्वेशी जैन, समीक्षा भटनागर, मनीश गोपलानी, अमित बहल, धीरज तोतलानी, आभास मेहता, वेदिका भंडारी आणि अर्चना वेडणेकर असे नामवंत कलाकार सहभागी झाले आहेत. ‘तेरा छलावा’मध्ये प्रेम, धोका आणि खूनाची गोष्ट सांगणाऱ्या पाच गोष्टी खास ट्विस्टसह पाहायला मिळणार असून त्या नक्की तुम्हाला खिळवून ठेवतील. या कथांचे दिग्दर्शन पाच वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी केले असून त्यात कबीर सदानंद (जलपरी), प्रबल बरूहा (हॅपी अॅ निव्हर्सरी), कबीर सदानंद (गुलाबो), दीपक सुनील प्रसाद (ओह बेबी) आणि राजिंदर सिंग पुल्लर (कश्मकश) यांचा समावेश आहे.
प्रेम तुम्हाला दऱ्याखोऱ्यातून वाट काढायला लावतं आणि समुद्र पार करायची प्रेरणा देतं असं म्हणतात. पण त्याचबरोबर ते तुम्हाला वेड लावू शकतं आणि काही अनपेक्षित संकटात टाकू शकतं. तेरा छलावा मध्ये विनाशाकडे घेऊन जाणाऱ्या प्रेमाच्या पाच अनवट गोष्टी पाहायला मिळणार आहेत. मग, ती आयुष्य नव्याने सुरू करू पाहाणारी वेश्या असो, आपलं पहिलं गरोदरपण साजरं करणारं आणि त्याचवेळेस विश्वासघाताला सामोरं जाणारं जोडपं असो, लग्नाच्या वाढदिवशी आपल्या पत्नीला आश्चर्यचकित करण्यासाठी वाट्टेल ते करणारा नवरा असो नाहीतर आयुष्यातला सर्वात कठीण निर्णय घेण्याची बळजबरी करण्यात आलेला प्रसिद्ध संगीतकार असो किंवा नकळतपणे आपल्याच विनाशाची कहाणी लिहिणारा यशस्वी कादंबरीकार असो… या सगळ्या गोष्टी प्रेमाची गुंतागुंत दर्शवतात. लव्ह किल्स हे आपण सर्वांनी ऐकलेलं आहे, पण कधी आणि कसं हे कोणालाच माहीत नाही. तेरा छलावा प्रेमाचा हाच पैलू उलगडणार आहे.
या अँथॉलॉजीविषयी हंगामा डिजिटल मीडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ रॉय म्हणाले, तेरा छलावा या शोमध्ये प्रेमाचे वेगळे पैलू मांडण्यात आले आहेत. या गोष्टी त्यातला अनपेक्षित ट्विस्ट आणि आश्वासक गुणवत्तेमुळे खिळवून ठेवतात. अशा प्रकारच्या गुंतवून ठेवणाऱ्या कथा आणि शोजच्या माध्यमातून कंटेट विस्तारण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.
या शोमध्ये अभिनय तसेच दिग्दर्शन असे दोन्ही करणारे दिग्दर्शक कबीर सदानंद म्हणाले, ‘या मालिकेतं प्रेमाचं एक वेगळंच रूप आणि आपल्या प्रियजनांना वाचवायचं म्हटल्यानंतर एखादी व्यक्ती कोणत्या थराला जाऊ शकते ते पाहायला मिळेल. या अँथॉलॉजीचा प्रकार लक्षात घेता माझी कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी आणि त्यांना सतत आता पुढे काय असा विचार करायला लावणारी असणं गरजेचं होतं. या कथेत कोणताही कंटाळवाणा क्षण असून चालणार नव्हतं. अभिनय करताना मजा आली. तो एक सुखद बदल होता. मला आशा आहे, की आमच्या व्यक्तीरेखा आणि त्यांची पडद्यावरची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडेल.