सांगली : अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्ष श्रीमती सोनियाजी गांधी यांची ईडीकडून होणारी चौकशी त्वरित थांबवा, असा इशारा सांगली शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने आज निषेध आंदोलन करून देण्यात आला. येथील स्टेशन चौकात हे आंदोलन झाले.
आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसचे नेते आमदार डॉ. विश्वजीत कदम,सांगली ग्रामीण जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, आमदार विक्रम सावंत, सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष विशाल पाटील, जिल्हा मध्यवर्ती उपाध्यक्षा जयश्रताई पाटील, प्रदेश महिला उपाध्यक्षा शैलजा भाभी पाटील यांनी केले.
डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, भाजपा सरकार केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करून काँग्रेसच्या नेत्या श्रीमती सोनियाजी गांधी यांना नाहक त्रास देत आहे. सोनिया गांधी या देश पातळीवरच्या प्रमुख नेत्या आहेत. गांधी घराण्यातील सर्वच व्यक्तिंनी देशासाठी फार मोठे काम केले आहे. परंतु आज राजकीय सूडबुद्धीने त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणाने उभा आहे. संपूर्ण देशभरातून त्यांच्यासाठी आवाज उठत आहे.
पृथ्वीराज पाटील म्हणाले, सोनियाजी गांधी या आजारी असतानासुद्धा त्यांची केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत चौकशी चालू केली आहे. काँग्रेसच्या सत्तेच्या काळात ही ईडी काय आहे, हे माहितदेखील नव्हते. अशा यंत्रणांच्या माध्यमातून काँग्रेसने कधीही सूडबुद्धीचे राजकारण केले नाही. मात्र भाजपा सत्तेवर आल्यानंतर सगळ्या तपास यंत्रणा विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या मागे लावल्या जातात. जे नेते भाजपच्या विरोधात बोलतात, आवाज उठवतात त्यांच्याविरोधात अशी कारवाई केली जात आहे. कुठलीतरी जुनी प्रकरणे काढायची आणि त्यांचा तपास करून बदला घेतला जात आहे. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशासाठी खूप मोठा त्याग केला आहे. मी इंदिराजींची सून आहे, अशा चौकश्यांना मी कधीच घाबरत नाही. असे उत्तर त्यांनी मीडियासमोर बोलताना दिले आहे. यावरून त्या किती कणखर आहेत हे लक्षात येते.
विशाल पाटील म्हणाले, सोनिया गांधी यांच्यावरील कारवाई त्वरित थांबवावी, अन्यथा संपूर्ण देशातील जनता पेटून उठेल. ज्या पक्षाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, त्या पक्षाच्या नेत्यांची चौकशी मुद्दाम केली जात आहे. पंतप्रधानपदाची संधी असतानासुद्धा त्यांनी माझा आतला आवाज हे पद स्वीकारायला नको म्हणून सांगतो, म्हणून त्यांनी ते पद नाकारले आणि डॉ. मनमोहन सिंग हे पंतप्रधान पदावर विराजमान झाले. हा इतिहास आहे. सोनियाजी आजारी असतानासुद्धा त्यांची चौकशी केली जात आहे हे अत्यंत चुकीचे आहे.
यावेळी जितेशभैया कदम, सुभाष खोत, सिकंदर जमादार, नंदकुमार कुंभार, देवानंद जमगी, बिपिन कदम, अमित पारेकर, महावीर पाटील, सुवरणा पाटील, संजय हजारे, अण्णासाहेब कोरे, प्रकश जाधव, रवी पाटील, बाबासाहेब कोडग, यांची भाषणे झाली.
आंदोलनामध्ये “नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी,” “चले जाव, चले जाव, मोदी सरकार चले जाव” अशा घोषणा देण्यात आल्या.
निषेध सत्याग्रह आंदोलनाला जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, पक्षाचे कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.