गांधी मैदानाच्या विकासासंदर्भात श्री शिवाजी तरुण मंडळाच्या बैठक
कोल्हापूर दि.२६ : ऐतिहासिक गांधी मैदान फक्त शिवाजी पेठेची अस्मिता नसून कोल्हापूरची अस्मिता आहे. कोल्हापुरातील अनेक नामवंत खेळाडू या मैदानात घडले असून, या मैदानाची दुरावस्था होण्याची मूळ कारणे शोधून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याकरिता दोन स्वतंत्र प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. याकरिता सुमारे २५ कोटींचा निधी अपेक्षित असून, येत्या काही दिवसात मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून या मैदानाच्या दुरुस्ती आणि सुशोभीकरणासाठी विशेष निधी मंजूर करून हा प्रश्न कायमचा मार्गी लावू, असे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी केले. गांधी मैदानाची दुरावस्था आणि आवश्यक उपाययोजना याबाबात श्री शिवाजी तरूण मंडळाच्यावतीने शिवाजी मंदिर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी बोलताना श्री शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष श्री.सुजित चव्हाण यांनी, गेले अनेक वर्षे या मैदानाची दुरावस्था झाली आहे. याबाबत शिवाजी पेठेतील नागरिकांकडून वारंवार मागणी होत आहे. या मैदानास निधी मंजूर व्हावा आणि मैदानाचा वापर पूर्ववत खेळासाठी व्हावा, अशी सर्वांची इच्छा आहे. मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे विकासाची दृष्टी असून, श्री.राजेश क्षीरसागर यांची कार्यपद्धती त्यांच्यासारखीच आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून गांधी मैदानासह शिवाजी पेठेतील इतर महत्वाची विकासकामे आणि प्रश्न श्री.क्षीरसागर यांनी मार्गी लावावीत, अशी मागणी करीत श्रेयवाद करण्यापेक्षा शिवाजी पेठेतील प्रत्त्येक नागरिकाने शिवाजी पेठ म्हणजे मी असा विचार करून शिवाजी पेठेचा लौकिक वाढवावा, असे सांगितले.
यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर म्हणाले, निवडणुकापुरते काम करण्याची आपली कार्यपद्धती नाही. शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावून, नागरिकांना सोयीसुविधा मिळवून देणे हे कर्तव्य समजतो. शिवाजी पेठेतील नागरिक कायम माझ्यासारख्या सर्वसामन्य कार्यकर्त्याच्या मागे ठाम उभे आहेत. त्यामुळे या पेठेतील नागरिकांचे आणि माझ जिव्हाळ्याच नात निर्माण झाल आहे. यापूर्वी रंकाळा तलावाच्या सुशोभीकरणासाठी नगरविकास विभागाकडून रु.१५ कोटी आणि पर्यटन विभागाकडून रु.५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. गांधी मैदानाच्या प्रश्नाची दाहकता समजून कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनास प्रत्यक्ष या मैदानाची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे मैदानात साठणाऱ्या सांडपाण्याचा निचरा होण्याकरिता रु.८ कोटी आणि गांधी मैदानात प्रेक्षक गॅलरी, वॉकिंग ट्रॅक, पॅव्हेलीयनची सुधारणा, मैदानाची उंची आदी विकासासाठी रु.१७ कोटी असे दोन प्रस्ताव तयार करण्यात आले असून, ते शासनाकडे सादर करण्यात आले आहेत. निश्चितच मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून हा निधी मंजूर करून गांधी मैदानाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. या मैदानातून नामांकित खेळाडू कोल्हापूरचे नावलौकिक करतील, याभावनेतून फुटबॉल खेळाडूना आवश्यक सुविधा पुरविण्यासही आपण कमी पडणार नसल्याचे सांगितले.
यावेळी श्री.शिवाजी तरुण मंडळाच्या कार्यकारणीच्या वतीने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांना गांधी मैदानाच्या विकासाबाबत निवेदन देण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुजित चव्हाण, मा.नगरसेवक अजित राऊत, अॅड.ए.वाय.साळोखे मा.नगरसेवक सचिन चव्हाण, शिवाजी जाधव, श्रीकांत भोसले पापा, राजेंद्र चव्हाण, सुहास साळोखे, प्रशिक्षक अमर सासणे सर, शशिकांत नलवडे, निखील कोराणे, विकास साळोखे, तुकाराम साळोखे, रणजीत जाधव, अभिजित राऊत, कपिल सरनाईक, योगेश चौगले, पियुष चव्हाण, रुपेश इंगवले, शैलेन्द्र गवळी, मयूर साळोखे, वैभव राऊत, मिलिंद साळोखे आदी उपस्थित होते.