कोल्हापूर : क्रेडिट अॅक्सेस इंडिया फाऊंडेशन, तसेच क्रेडिट अॅक्सेस ग्रामीण लि. यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापुरातील ग्रामीण भागातील विद्यार्थीनींना एका कार्यक्रमात समारंभपूर्वक शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. क्रेडिट अॅक्सेस इंडिया फाऊंडेशन भारतातील सर्वात मोठी मायक्रोफायनान्स संस्था असून संस्थेचा प्रमुख कार्यक्रम “ग्रामीण विद्या’ अंतर्गत कोल्हापूर येथे आयोजित कार्यक्रमात शिष्यवृत्ती वितरण करण्यात आले. यामध्ये गुणवंत विद्यार्थिनींना 80,000 रुपयांची शिष्यवृत्ती श्री गणेश गोडसे, लीड बँक मॅनेजर – बँक ऑफ इंडिया आणि सीए ग्रामीण संघ प्रतिनिधी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
या उपक्रमाद्वारे, फाऊंडेशन सरकारी शाळांमध्ये शिकलेल्या इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुलींना एक वेळच्या गरजेनुसार आर्थिक/गैर-आर्थिक सहाय्य करते. इयत्ता दहावीच्या पुढे अभ्यास करण्यास याद्वारे प्रोत्साहन दिले जाते. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 200 मुलींना मदत करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. समान संधी निर्माण करून तळागाळातील महिलांना सक्षम करण्यासाठी सीए ग्रामीण गेल्या 20 वर्षांपासून हा उपक्रम राबवित आहे.
शिष्यवृत्ती प्राप्त एक विद्यार्थीनी वैभवी कुमार पाटील हीने मनोगत व्यक्त करताना क्रेडिट अॅक्सेस ग्रामीणने माझी गुणवत्ता ओळखून दिलेल्या शिष्यवृत्तीमुळे आनंद झाल्याचे सांगितले. मला दहावीच्या बोर्ड परीक्षेत 97.7% गुण मिळाले होते. त्याची दखल घेतली याचा आनंद आहे. मला जिल्हाधिकारी होण्याची ईच्छा आहे. आणि शिष्यवृत्तीमुळे मला पुढील शिक्षण घेण्यास आणि माझे स्वप्न साकार करण्यास मदत होईल, असे वैभवी कुमार पाटील हीने सांगितले. संगणक अभियंता बनण्याची ईच्छा असणाऱ्या करीना कांबळेला फाऊंडेशनकडून लॅपटॉपचे सहकार्य मिळाले.