कोल्हापूर दि.१८ : कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रम के.एम.टी. कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात कर्मचाऱ्यांच्या वतीने गेले अनेक पाठपुरावा सुरु आहे. यातील कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाची रक्कमेचा प्रश्न राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या पाठपुराव्याने यापूर्वीच मार्गी लागला आहे. उर्वरित ७ वा वेतन आयोग, रोस्टर प्रमाणे रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून घेणे आणि रखडलेली पदोन्नती याबाबत बैठका झाल्या असून, प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केल्याचे दिसून येत नाही. हे प्रश्न मार्गी लागले नाही तर काम बंद आंदोलनाचा इशारा म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट वर्कर्स युनियन (रजि.) यांनी दिला आहे. याबाबत सदर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांची शिवालय, शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय, शनिवार पेठ, कोल्हापूर येथे भेट घेवून, या मागण्यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी केली.
यावेळी बोलताना संघटनेचे अध्यक्ष श्री.प्रमोद पाटील यांनी सन २०१९ पासून कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्याना ७ वा वेतन आयोग फरकासह लागू झालेला आहे. परंतु, के.एम.टी. कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग लागू करण्यास टाळाटाळ केली जात आहे. तो तात्काळ लागू करावा. रोजंदारी कर्मचारी गेली २५ ते ३० वर्षे काम करत असून, बिंदू नामावली (रोस्टर) तपासून २ महिन्यांचा अवधी झाला तर त्यांना सेवेत कायम करण्याचा निर्णय प्रलंबित आहे. यासह पद्दोनती प्रक्रियाही रखडली असल्याची माहिती देत. यामध्ये लक्ष घालून प्रलंबित मागण्या मार्गी लावण्याबाबत विनंती केली.
यावर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी महानगरपालिका प्रशासक सौ.कादंबरी बलकवडे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून के.एम.टी.कर्मचाऱ्यांच्या ७ वा वेतन आयोग, रोस्टर व पदोन्नती प्रक्रिये संदर्भात दोन दिवसात प्रस्ताव शासन स्तरावर सादर करण्याच्या सुचना दिल्या. यानंतर संघटनेच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना सादर करण्यात येणाऱ्या प्रस्तावांचा शासन स्तरावर पाठपुरावा करून लवकरात लवकर के.एम.टी. कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावू, असे सांगितले.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख उदय भोसले, तुकाराम साळोखे, किशोर घाटगे, उपशहरप्रमुख अश्विन शेळके, म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट वर्कर्स युनियन (रजि.) संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पाटील, जनरल सेक्रेटरी इर्शाद नायकवडी, राजू वडर, मानसिंग जाधव, मारुती पाटील, सचिन गवळी, ज्ञानबा शिंदे, अनिल चव्हाण आदी कर्मचारी उपस्थित होते.