उदगीर प्रतिनिधी- संवेदनशील विचारांना संयमाने व्यक्त करण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे पत्रे. संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांना आपले आयकॉन मानून जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती या विचारांचा अंगीकार करत इतरांबद्दलच्या आपल्या उत्कट भावना पत्राच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने लिहिलेली पत्रे ज्यामध्ये संवेदनशील विचारांचे घुसमट होते अशा शिल्लक पत्रांचा संग्रह म्हणजे न पाठवलेली पत्रे होत असे मत प्रसिद्ध गझलकार बालाजी मुंडे बिनधास्त किनगावकर यांनी व्यक्त केले.
कचरूलाल मुंदडा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या वाचक संवादाच्या 281 व्या पुष्पात राजेसाहेब कदम लिखित न पाठवलेली पत्रे या साहित्यकृतीवर बालाजी मुंडे, बिनधास्त किनगावकर यांनी वाचकांशी संवाद साधताना पुढे म्हणाले की, सर्वसामान्यांच्या मनातील वैचारिक प्रवाहाचा अविष्कार व त्यातून मिळणारा स्वानंद घेत पत्रातील विचारांना न्याय देण्याचा प्रयत्न लेखक प्रसिद्ध साहित्यिक राजेसाहेब कदम यांनी या पुस्तकात केला आहे. शेवटी अध्यक्षीय समारोपात कचरूलाल मुंदडा म्हणाले की, संवेदनशील विचारांच्या पत्रावर आपले बेधडक मनोगत व्यक्त करताना लेखकाला योग्य न्याय देण्याचे काम संवादक मुंडे यांनी केले असून राजेसाहेब कदम यांनी न पाठवलेल्या पत्रांचा संग्रह प्रकाशित करून आम्हा वाचकांना एक वेगळा विचार दिलेला आहे. कार्यक्रमाचे संचालन संयोजक अनंत कदम यांनी केले तर आभार तुळशीदास बिरादार यांनी मानले.
या वेळी सर्व उपस्थितांना दैनिक लोकमत च्या दिवाळी अंकाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास अहमदपूरचे प्रसिद्ध साहित्यिक तथा लेखक राजेसाहेब कदम, प्रा.अनिल चवळे, सुरेश वजनम, सूर्यकांत पाटील, प्रतिभा वजनम, जाधव ताई, सुचिता कदम उमाताई ढगे, डॉ शेटकार एम.बी.आदींसह वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.