आज गुरुवार दि. १३ जुलै २०२३ रोजी सकाळी सव्वानऊ वाजताचा कोल्हापूर शहरातील हा प्रसंग……..*
बागल चौकाकडून रस्त्याच्या उजव्या बाजूने मी केडीसीसी बँकेकडे चालत येत होतो. माझ्यापुढेच काही अंतरावर रस्त्याच्या डाव्या बाजूने साधारणता सत्तरीच्या घरातील दोन्ही हातात दोन गाठोडी घेतलेली एक वृद्ध महिलाही चालत होती. केस एकदम बारीक कापल्यामुळे खरंतर ती पुरुष वाटत होती. अंगात काळा शर्ट आणि त्यावर गाऊन असा थोडा विचित्रच पोषाख तिच्या अंगावर होता. खरंतर ती दिसायला वेडसर वाटत होती. परंतु; नंतर लक्षात आले की, ती वेडी किंवा मतिमंद नाही. तिच्या वृद्धत्वाला कंटाळून घरातल्यांनीच तिला वाऱ्यावर सोडलेले दिसते.
मी तिच्याकडे बघत -बघतच चालत होतो. एवढ्यातच सुपर सीट कुशन वर्क्स या दुकानासमोर उभा असलेल्या तरुणाने तिला विचारले, “आजी थोडी चपाती -भाजी खाणार काय?” आजीही म्हणाली, “दे की बाळा.” त्याने आत जाऊन आपल्या दुपारच्या डब्यातील चपाती आणि भाजी कॅरीबॅगमध्ये घालून तिला दिली. आजीकडील प्लास्टिकची रिकामी बॉटल घेऊन, दुकानातल्या कॅम्परमधून त्यांने पाणीही आणून दिले. एवढेच काय, “आजी, इथे दुकानसमोर थोडी घाण आहे. त्या समोरच्या बंद दुकानाच्या पायऱ्यांवर चांगल्या जागेत बसून तू खा.” असं म्हणत तिची दोन्हीही गाठोडी उचलली आणि आजीला घेऊन समोरच्या स्वच्छ पायऱ्यांवर आणून बसवले. कदाचित; हा तरुण या दुकानातील कामगार असावा.
हा सगळा प्रकार पहात- पहातच, मी मोबाईलवर फोटो घेत होतो. मी त्या तरुणाला म्हटलं, “भावा मानलं तुला आणि त्याचं नाव विचारलं. तो म्हणला, “मलिक बनहट्टी……..!”
मलिक बनहट्टीसारख्या अशा लोकांमुळेच म्हटलं जातं, “कोल्हापूरकरांच्या रक्तातच माणुसकी, दया आणि प्रेम ठासून भरलेलं आहे……..!”
पत्रकार शिवाजी पाटील -गोरंबेकर
मोबा. 9922949998