मराठी मनोरंजन विश्वात अल्पावधीतच लोकप्रियता मिळवलेली वाहिनी शेमारू मराठीबाणा आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे एक भव्य दिव्य पौराणिक मालिका. साक्षात शंकराचा अंश असलेला भैरवनाथ आणि पार्वतीची परमभक्त जोगेश्वरी यांचे बंध कसे जुळले हे कथा म्हणजे जोगेश्वरीच्या पती भैरवनाथ हि मालिका. आजवर कोणत्याच माध्यमातून फारशी न उलगडलेली परंतू अतिशय उत्कंठावर्धक असलेली जोगेश्वरी-भैरवनाथाची हि कथा आता आपल्याला अनुभवता फक्त आपल्या शेमारू मराठीबाणा या वाहिनीवर..
नागलोकाची राजकन्या जोगेश्वरी आणि स्मशानात रमणारा असा भैरवनाथ हे एकत्र कसे येणार?, त्यांची लगीनगाठ कशी बांधली जाणार? राकट असा भैरव जोगेश्वरीचं मनं जिंकू शकेल का? भैरवनाथ जोगेश्वरीच्या नात्याचे असे अनेक पदर या मालिकेच्या माध्यमातून उलगडले जाणार आहेत. अनेक प्रकारच्या अद्भूत कथांनी भारलेलं चरित्र आहे शिवाच्या पाचव्या अवताराचं म्हणजेच भैरवनाथांचं. भैरव म्हणजे भयाचा नाश करणारी देवता. हातामध्ये त्रिशुळ,कपाळी भस्म, रंगीत मूर्ती आणि सोबतीला काळा कुत्रा असं भैरवनाथाचं रुप आपल्याला बघायला मिळतं. तर फुलाप्रमाणे नाजूक, सगळ्यांचं मन जपणारी, देवी पार्वतीची निस्सीम भक्त असलेली जोगेश्वरी. देवी पार्वतीच्या आशीर्वादाने जोगेश्वरीची इच्छा पूर्ण होणार पण भैरवनाथ जोगेश्वरीच मन जिंकण्यात यशस्वी होणार का हे पाहणं नक्कीच मनोरंजक असेल. श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवाराच्या शूभदिनी ही जोगेश्वरीचा पती भैरवनाथ ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वा. शेमारू मराठीबाणा वाहिनीवरुन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
या मालिकेमध्ये भैरवनाथाच्या राकट आणि दमदार मुख्य भूमिकेत अभिनेता प्रतिक निकम बघायला मिळणार आहे तर सौंदर्यवती अशा जोगेश्वरीची भूमिका क्षमा देशपांडे ही नवोदित अभिनेत्री साकारणार आहे. या भूमिकेबद्दल बोलतांना अभिनेता म्हणाला की, “आजवर बऱ्याच देवी देवतांच्या गाथा विविध मालिका चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांनी बघितल्या आहेत. परंतू आता प्रथमच भैरवनाथाची गोष्ट अतिशय रंजक पद्धतीने सादर होणार आहे आणि ही भूमिका मला साकारायला मिळाली हे मी माझं भाग्यच समजतो. या भूमिकेबद्दल मी अतिशय उत्सुक असून प्रेक्षकांना ही भूमिका आवडेल अशी मला आशा आहे.”
तर जोगेश्वरीची भूमिका साकारणारी क्षमा देशपांडे म्हणाली की, “आजवर जोगेश्वरी माता हे पात्र कोणत्याच मालिका किंवा चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आलेलं नाहीये. त्यामुळे आजवर कधीच चित्रीत न झालेलं हे पात्र साकारण्याची संधी मला मिळतेय ही माझ्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे. या मालिकेच्या माध्यमातून जोगेश्वरीदेवीची माहिती प्रेक्षकांना मिळणार आहे. या भूमिकेसाठी मी विशेष मेहनत घेतली आहे. जोगेश्वरी आणि भैरवनाथाच्या संसाराची ही अनोखी गोष्ट प्रेक्षकांना आवडेल याची मला खात्री आहे.”
मनोरंजनाच्या विश्वात एक महत्त्वाचं नाव असलेल्या शेमारूची मराठीबाणा ही वाहिनी प्रेक्षकांना कायमच काही तरी आगळं वेगळं देण्याचा प्रयत्न करत असते. जोगेश्वरीचा पती भैरवनाथ या मालिकेद्वारे ते मालिकांच्या विश्वात पदार्पणाचं एक आश्वासक पाऊल टाकत आहेत हे विशेष. मालिका प्रदर्शनापूर्वीच टिझर आणि प्रोमोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. प्रेक्षक या मालिकेची आतुरतेने वाट बघत आहेत त्यामुळे ही मालिका ते अतिशय प्रेमाने स्वीकारतील असा विश्वास वाहिनीच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
आजवर मराठीत अनेक उत्तमोत्तम आणि दर्जदार पौराणिक मालिका देणारे लेखक-दिग्दर्शक-निर्माते संतोष अयाचित यांनीच या मालिकेची निर्मिती केली आहे.
श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवाराच्या शूभदिनी ही जोगेश्वरीचा पती भैरवनाथ ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे आपल्या लाडक्या शेमारू मराठीबाणा वाहिनीवरून.