मुंबई , ३० सप्टेंबर २०२३ : जगात वाईट पुरुष जात, सगळेच लुचे एकसाथ.. म्हणत काही बायकांनी सगळे पुरुष सारखेच असतात असं घोषितच केलंय. कोण आहेत या बायका आणि पुरुषांविषयी इतका तिटकारा का असेल बरं की त्यांनी आपल्या घरात देखील पुरुषांचा प्रवेश निषिद्ध केलाय. पुरुषांशिवाय काही अडत नाही असं मानणाऱ्या या बायकांनी ते सिद्ध सुद्धा करून दाखवलेले आहे. पुरुषांचा इतका तिरस्कार करण्यामागे नेमकं कारण तरी काय असेल.. अहो.. हो.. हो.. आपली लवकरच भेट होणार आहे तेंडुलकर महिला कुटुंबाशी. सोनी मराठी आपल्या मनोरंजनाच्या पिटाऱ्यातून आणखी एक मजेदार गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत. राकेश सारंग यांची खुमासदार नात्यांचा गोडा मसाला ही नवीकोरी मालिका ३ ऑक्टोबरपासून सोम. ते शुक्र रात्री ९.०० वा. सोनी मराठीवर पाहायला मिळणार आहे.
मुंबईतल्या उपनगरात अजूनही टिकून राहिलेलं एक जूनं बैठं घर ज्याला आसपासची लोक चेटकिणींचं घर म्हणून ओळखतात तेच आहे तेंडुलकरांचं घर. वैयक्तिक आयुष्यात आलेल्या अनुभवांनी काहीशा पुरुषघाण्या झालेल्या भागीरथीबाई या घराच्या प्रमुख आहेत. तर मालिनी तेंडुलकर मोठी सून आणि तिच्या दोन मुली दिव्या आणि सानिका. यांसोबतच भागीरथीबाईंची धाकटी मुलगी पल्लवी हिचा घटस्फोट झाला आहे आणि तिच्या मुलीच्या कस्टडीची केस अजूनही कोर्टात चालू आहे. परिस्थितीवर मात करत भागीरथीबाईंनी चालवलेला आपल्या मसाल्याचा व्यवसाय या सगळ्या मिळून सांभाळतात. तेंडुलकरांच्या गोड्या मसाल्याची कीर्ती सर्वदूर पसरलेली असल्याने त्यांच्या व्यवसायाचा चांगलाच जम बसलेला आहे.
सगळं काही सुरळीत चालू असताना अचानक एक वादळ तेंडुलकर महिलांच्या आयुष्यात आलंय. सगळे पुरुष सारखे नसतात.. काही माझ्यासारखे ही असतात म्हणणारा एक उमदा तरुण तेंडुलकर महिलांच्या विश्वात एंट्री तर घेतो पण.. तो या महिलांची विचारसरणी बदलू शकेल का..? भागीरथीबाईंसमवेत घरातील इतर महिलांच्या स्वभावात आलेली कटूता कमी करायला हा तरुण मदत करेल का..? सानिकावरील प्रेमाखातर तेंडुलकरांच्या घरातील महिलांचे प्रश्न सोडवण्यात तो यशस्वी होईल का..? हे आणि असे अनेक प्रश्न तुमच्या ही मनात घर करू लागले असतीलच आणि म्हणूनच त्यासाठी आपल्याला ‘खुमासदार नात्यांचा गोडा मसाला’ हा पाहायलाच हवाय. शिवाय राकेश सारंग यांच्या ‘खुमासदार नात्यांचा गोडा मसाला’ या मालिकेच्या निमित्ताने ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे, सीमा देशमुख, शर्वाणी पिल्ले, विनय येडेकर यांसारख्या कसलेल्या कलाकारांसोबतच महिमा म्हात्रे, रेवती लिमये, अनुज साळुंखे, अमित खेडेकर, अजिंक्य जोशी या नवोदित कलाकारांचा अभिनय पाहता येईल हे विशेष.
कधी भक्तीमय… कधी हास्याची कारंजी… कधी माहितीपर विषय तर कधी नात्यांची सुरेख गुंफण दाखवणाऱ्या सोनी मराठी वाहिनीला प्रेक्षकांच्या पसंतीची उत्तम जाण आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. प्रेक्षकांच्या मनोरंजनात सातत्याने भर घालणारी वाहिनी म्हणून सोनी मराठीकडे रसिक-प्रेक्षक पाहतात आणि त्याचसाठी ही वाहिनी देखील प्रेक्षकांच्या पसंतीला मान देत सर्वोतोपरी कार्यरत असते. एकामोगोमाग एक असे उत्तम कथानक असणारे कार्यक्रम आणि मालिका सध्या सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी घेऊन येत आहेत आणि त्यातलीच एक विनोदी पण कारुण्याची झालर असणारी मालिका म्हणजे ‘खुमासदार नात्याचा गोडा मसाला’. या आंबट-गोड विषयाला थोडा तिखटाची फोडणी असलेला हा गोडा मसाला तुम्हाला नक्कीच रुचेल अशी आशा आहे तेव्हा पाहायला विसरू नका ३ ऑक्टोबरपासून सोम. ते शुक्र. रात्री ९.०० वा. फक्त आणि फक्त सोनी मराठीवर ‘खुमासदार नात्याचा गोडा मसाला’.