मुंबई, ३० सप्टेंबर २०२३ : गूढ, शांत आभा निवास आणि एका असहाय आईसोबत दोन लहान मुलींचा आर्त आक्रोश मांडणारी अनोखी कथा म्हणजेच ‘खरंच तिचं काय चुकलं?’. उत्कंठा ताणून धरणारा सोनी मराठीवरील एक प्रोमो सध्या सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतो आहे. वेगवेगळ्या विषयांवरील मालिकांद्वारे सोनी मराठी नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते, पण आता सोनी मराठी वाहिनी बऱ्याच दिवसांनंतर एक गूढकथा रसिक-प्रेक्षकांसाठी घेऊन येते आहे. आभा निवास, आभा, कुहू, दमयंती अग्निहोत्री आणि श्रेयस अग्निहोत्री यांच्या सभोवताली घडणारी ही रोमांचकारी गोष्ट लवकरच म्हणजेच ३ ऑक्टोबरपासून सोम. ते शुक्र. रात्री ९.३० वा. आपल्याला सोनी मराठीवर पाहता येणार आहे.
आभा आणि कुहू दोन सख्ख्या बहिणी, पण स्वभाव मात्र टोकाचे. एक मनमिळाऊ तर दुसरी आत्मकेंद्री. एक समजूतदार तर दुसरी अविचारी. आभाला स्वकष्टाचं मोल तर कुहूला झटपट श्रीमंतीची ओढ. दोघींचा प्रवास सुखकर आयुष्याचाच पण एकीचा सरळमार्गी तर दुसरीला आपले ईप्सित साध्य करण्यासाठी वाट वाळवावी लागली तरी बेहत्तर. या दोघीही नकळत आपल्या भूतकाळाशी बांधल्या गेल्या आहेत. असा भूतकाळ ज्याच्याबद्दल दोघीही अनभिज्ञ आहेत. या सगळ्यांत आभा निवास आणि त्या अनुषंगाने येणारे दमयंती आणि श्रेयस अग्निहोत्री हेसुद्धा या गूढकथेत गुंतले गेले आहेत.
आभा आणि कुहू यांचा भूतकाळ त्यांच्या वर्तमानकाळावर भारी पडेल का..? काय आहे त्यांचा भूतकाळ..? या भूतकाळावर मात करण्यासाठी आभा आणि कुहू या दोघी परस्परविरोधी स्वभावाच्या बहिणी एकत्र येतील का..? आभा आणि कुहू यांचा दमयंती आणि श्रेयस यांच्याशी नक्की संबंध तरी काय..? आभा निवासचं गूढ उलगडणार का..? हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. गिरीश वसईकर दिग्दर्शित ‘खरंच तिचं काय चुकलं?’ या नव्या रहस्यमयी मालिकेत आभा आणि कुहू यांच्या भूमिकेत ज्योती निमसे आणि भाग्यश्री दळवी हे दोन नवे प्रॉमिसिंग चेहरे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत तर गायत्री सोहम आणि रोशन विचारे हे अनुक्रमे दमयंती आणि श्रेयस अग्निहोत्री यांच्या भूमिकांत आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
क्षणोक्षणी मनाचा ठाव घेणारी, ‘खरंच तिचं काय चुकलं?’ ही मालिका प्रेक्षकांना नक्कीच एक वेगळा अनुभव देणारी ठरेल यात काही शंका नाही, पण त्यासाठी आपल्याला ‘खरंच तिचं काय चुकलं?’ ही मालिका न चुकता पाहायला लागणार आहे आणि ती तुम्ही पाहू शकता, ३ ऑक्टोबरपासून सोम. ते शुक्र. रात्री ९.३० वा. फक्त आणि फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.