कोल्हापूरच्या दिशेने स्वारी निघाली की, कोल्हापूरची देवी अंबाबाईचं दर्शन घेतल्याशिवाय दौरा पूर्ण होऊच शकत नाही. देवीच्या दर्शनासाठी आपसूक सर्वांची पाऊलं मंदिराच्या दिशेने वळू लागतात. ‘सन मराठी’ वाहिनीच्या कलाकारांना देखील देवी आईचं रुप, सौंदर्य डोळ्यांत सामावून घेतल्याशिवाय चैन पडत नव्हतं.
‘सन टीव्ही नेटवर्क’ची ‘सन मराठी’ ही वाहिनी त्यांच्या ‘सोहळा नात्यांचा’ या ब्रीदवाक्याप्रमाणेच प्रेक्षकांसोबत असलेलं नातं साजरं करते. या वाहिनीवरील सर्व मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिका बनल्या आहेत आणि प्रेक्षक देखील त्यांचं प्रेम सोशल मिडीयाच्या माध्यमातून कलाकारांपर्यंत पोहचवत असतात. नुकतेच, या वाहिनीवरील ‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’, ‘सुंदरी’ आणि ‘सावली होईन सुखाची’ या तीन मालिकेतील कलाकारांनी कोल्हापूरात विविध ठिकाणी हजेरी लावली.
‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’ मालिकेत ‘वेतोबा’ची भूमिका साकारणारा अभिनेता उमाकांत पाटील, ‘सुंदरी’ मालिकेतील नायिका आरती बिराजदार, स्वाती लिमये आणि ‘सावली होईन सुखाची’ मालिकेचा अभिनेता रौनक शिंदे या कलाकारांनी सर्वात प्रथम अंबाबाईचं दर्शन घेतलं आणि प्रत्येकाने त्यांच्या मालिकेच्या यशस्वी वाटचालीसाठी प्रार्थना केली.
कोल्हापूरातील इतर ठिकाणांना भेट देऊन त्यांनी कोल्हापूरचा आनंद लुटला. या मालिका प्रेक्षक टिव्हीवर पाहतात पण टिव्हीतील कलाकार प्रत्यक्ष समोर दिसले तर काय होईल… याचा अनुभव कोल्हापूरवासी प्रेक्षकांनी घेतला. कलाकारांनी प्रेक्षकांसोबत छान गप्पा केल्या, प्रेक्षकांनी देखील त्यांच्या प्रतिक्रिया त्यांच्यापर्यंत पोहचवल्या. कोल्हापूरमध्ये घालवलेल्या एक अन एक क्षणांचा आनंद या कलाकारांनी मनापासून लुटला आणि पुन्हा एकदा कोल्हापूरला येण्याची इच्छा बोलून दाखवली.