कोल्हापूर,दि.५(जिमाका) : सद्या सर्वच ठिकाणी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या कामांची धावपळ सुरू असून मतदारांमधे चर्चेचे वातावरण आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ७ मे रोजी मतदान होणार असून या पार्श्वभूमीवर लोकांना मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी त्याचे महत्त्व विविध स्तरावरून स्वीप अंतर्गत सांगितले जात आहे. निवडणुकीसाठी अधिकाधिक नागरिकांनी आपला मतदानाचा अधिकार वापरावा आणि मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत पथनाट्यासारखे उपक्रम शहरातील विविध भागात राबविण्यात येत आहेत. याच अनुषंगाने जिल्हयातील केआयटी कॉलेजच्या एनएसएसच्या मुलांमार्फत मतदारांना पथनाट्यातून मतदार जनजागृतीद्वारे माहिती देवून मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. पैसे घेवून केलेल्या मतदानामुळे भविष्यात आपल्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जाते आणि त्याचा तोटा जनतेला सहन करावा लागतो. त्यामुळे स्वत:ला विकू नका अशा आशयाचा संदेश तरूण मतदार सर्व वयोगटातील मतदारांना देत आहेत. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भेट देवून पथनाट्यातील मुलांना प्रोत्साहन दिले व कार्यक्रमाची प्रशंसा केली. यावेळी उपजिल्हाधिरी निवडणूक समाधान शेंडगे, स्वीपचे जिल्हा नोडल नीलकंठ करे, सहायक नोडल स्वीप वर्षा परिट, केआयटी एनएसएसचे नोडल तसेच सहभागी विद्यार्थी उपस्थित होते.
पथनाट्यातून आपल्या एका मतामुळे आपला देश योग्य माणसांच्या हातात दोतोय की नाही? हा विचारही मतदारांनी करावा असा संदेश दिला आहे. तसेच चुकीचा निवडलेला उमेदवार जनतेच्या भल्यासाठी काम न करता फक्त स्वहीत पाहतो. याला फक्त मतदानाचा अधिकार योग्यरीतीने न वापरणे हीच गोष्ट जबाबदार आहे. निवडणुकीत मतदान करून मतदानाचा टक्का वाढलाच पाहिजे असे पथनाट्यातून ठणकावून सांगितले जात आहे. प्रत्येक मतदाराने त्याला राज्य घटनेने दिलेला मतदान करण्याचा हक्क बजावावा यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने केल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती देण्यात आली. मतदारांसाठी पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची माहिती देण्यात आली. मतदानाचा टक्का वाढवा, यासाठी निवडणूक आयोगाने केलेल्या सूचनेनुसार सर्व मतदान केंद्र ही तळमजल्यावर उभारण्यात येणार आहेत. दिव्यांग, विशेष व्यक्तींना आपला मतदानाचा अधिकार वापरता यावा, यासाठी रस्त्यापासून मतदान केंद्रापर्यंत व्हीलचेअर, तसेच रॅम्पची सोय असणार आहे. मतदानासाठी आलेल्या दिव्यांग व्यक्तींना रांगेत उभे राहावे लागणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात येणार आहे, अशी माहिती या वेळी दिली.