मधुगंधा कुलकर्णी, निपुण धर्माधिकारी यांचे लेखन व दिग्दर्शन आणि स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर यांचा अभिनय यांसाठी चर्चेत असलेल्या ‘लग्नपंचमी’ या धमाल विनोदी नाटक चा शुभारंभाचा प्रयोग आनंद भवन कोल्हापूर येथे रविवारी ११ जानेवारी २०२६ रोजी
कोल्हापूर : मराठी रंगभूमीवरची दोन सर्जनशील, संवेदनशील आणि बहुमुखी कलावंत मधुगंधा कुलकर्णी आणि निपुण धर्माधिकारी यांचे अनुक्रमे लेखन व दिग्दर्शन तसेच स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर यांच्या भूमिका यांमुळे चर्चेत असलेले नवे मराठी नाटक ‘लग्नपंचमी’चा शुभारंभाचा प्रयोग आनंद भवन कोल्हापूर येथे रविवारी ११ जानेवारी २०२६ रोजी पार पाडत आहे. मराठी नाट्यसृष्टीत प्रचंड उत्सुकता लागून राहिलेल्या या नाटकाचे सलग तीन प्रयोग कोथरूड, पुणे येथे पार पडणार असून त्यानंतर मुंबईत ते जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहेत.
चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील उत्तुंग यश मिळविलेले नाट्यकर्मी या नाटकाच्या माध्यमातून एकत्र येत असल्याने मराठी रंगभूमीवर आणि रसिकांमध्येसुद्धा कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. मधुगंधा यांचे लेखन व निर्मिती आणि निपुण धर्माधिकारी यांचे दिग्दर्शन व जोडीला स्वप्नील जोशी यांचे तब्बल बारा वर्षांनी रंगभूमीवर होत असलेले पदार्पण यामुळे रसिक या नाटकाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याशिवाय मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील एक ग्लॅमरस चेहरा अमृता खानविलकर या नाटकाच्या माध्यमातून मराठी रंगभूमीवर पदार्पण करत आहे. त्यामुळे या नाटकाची चर्चा सध्या रसिकांमध्ये आहे. या माध्यमातून मराठी रंगभूमीला एक ताजेतवाने, मनमोकळे आणि वास्तववादी नाटक लाभणार आहे, हे नक्कीच.‘लग्नपंचमी’ हा लग्नातील विरोधाभास, भावना, विनोद आणि नात्यांचा बहुरंगी प्रवास अत्यंत मनमोकळ्या पद्धतीने मांडणारा नवीन मराठी प्रयोग म्हणून या नाटकाकडे पाहिले जात आहे.
स्वप्नील आणि अमृता यांच्यासह या नाटकात सुनील अभ्यंकर, मधुगंधा कुलकर्णी यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. ‘मयसभा’निर्मित ‘लग्नपंचमी’चे नेपथ्य संदेश बेंद्रे, प्रकाश शीतल तळपदे, वेशभूषा पूर्णिमा ओक यांची असून नितीन नाईक सहनिर्माता आहेत. मधुगंधा कुलकर्णी, स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर आणि तृप्ती पाटील या नाटकाचे निर्माते आहेत.
“नवरा म्हणे ‘पंच मी’, बायको म्हणे, ‘लग्नपंचमी” या टॅगलाईनसह हे नाटक रंगभूमीवर येत आहे.
“जशी रंगपंचमीला रंगांची उधळण होते, तशीच लग्नात भावभावनांची पंचमी असते. लग्न म्हणजे केवळ एका व्यक्तीशी नातं जोडणं नाही… तर त्याच्या अनेक व्यक्तिमत्त्वांशी नातं जोडणं! हे नाटक प्रेक्षकांना नक्कीच भावेल. त्याच्या पहिल्या प्रयोगाबद्दल आम्हाला सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे आहे,” मधुगंधा म्हणतात.
निपुण धर्माधिकारी सांगतात, “लग्न या विषयावर विनोद न ऐकलेला माणूस दुर्मिळ. ‘लग्नपंचमी’मधील पात्रे सुखी संसाराचा साधा मंत्र वारंवार विसरतात आणि त्यातून जी गंमत जमत घडते ती यात अनुभवायला मिळणार आहे. प्रेक्षकांप्रमाणे आम्हालाही पहिल्या प्रयोगाची उत्सुकता आहे.”
स्वप्नील जोशी म्हणतो, “गेली कित्येक वर्षे मला माझे चाहते जो प्रश्न विचारात होते, की ‘तू नाटकात कधी दिसणार’, त्याचे उत्तर या नाटकाच्या माध्यमातून मिळते आहे. माझे आवडते लेखक, दिग्दर्शक माझ्याबरोबर आहेत आणि माझी मैत्रीण अमृता नाटकात प्रमुख भूमिकेत आहे. त्यामुळे एक उत्तम प्रयोग या निमित्ताने रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.”
अमृता या नाटकाबद्दल बोलताना म्हणाली, “या नाटकाच्या तालमी करताना आम्हाला खूप मजा येते आहे. आमच्या सर्वांचे सूर जुळून आले आहेत आणि ते नाटकामाध्येही दिसून येईल. हे माझे पहिलेच नाटक आहे.
माझ्या आवडत्या नाट्यकर्मींबरोबर काम करायला मिळते आहे. चित्रपट आणि मालिका-शोंप्रमाणे रसिक या नाटकामध्येही मला उत्तम प्रतिसाद देतील याची खात्री आहे.”
लग्नपंचमी’ या धमाल विनोदी नाटक चा ११ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता आनंद भवन कोल्हापूर, येथे शुभारंभ
RELATED ARTICLES







