कोल्हापूर /प्रतिनिधी
शासनाच्या विविध पदभरतीच्या परिक्षा महापोर्टलद्वारे घेण्यात येतात.मात्र या महापोर्टल मध्ये अनेक गैरप्रकार होत असून प्रामाणिकपणे अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्यामुळे हे महापोर्टल बंद करावे या संदर्भात आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत लक्षवेधी सूचना मांडली.महापोर्टल संदर्भात विश्वासार्हता राहिली नसल्यामुळे त्यातील उणिवा दूर करण्यापेक्षा महापोर्टलच रद्द करण्याशिवाय पर्याय नसल्याचे आमदार सतेज पाटील यांनी यावेळी नमूद केले.
पूर्वी शासनाच्या पदभरती परिक्षा एमकेसीएलद्वारे घेणेत येत होत्या.त्यावेळी कोणत्याही प्रकारच्या तक्रारी आल्या नव्हत्या.महापोर्टलच्या माध्यमातून झालेल्या परिक्षांपैकी कृषी सहायक,नगरपरिषद,राज्य गुप्त वार्ता,ग्रामविकास या भरती परिक्षांसंदर्भात तक्रारी आल्या असून राज्यभरातून महापोर्टल विरुध्द पासष्ठ मोर्चे निघाले असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सभागृहात सांगितले.डायरेक्टर अॅकॅडेमिक्स आणि डायरेक्टर डोमेन एक्स्पर्ट यांची नेमणूक करताना काय निकष लावले?विविध परिक्षांसाठी भरले जाणारे शुल्क नेमके कुणाच्या खिशात जाते असे सवाल उपस्थित करत महापोर्टल रद्दच करणेत यावे अशी आग्रही मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली.