कोल्हापूर/प्रतिनिधी
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी आपले कर्ज खाते त्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने 27 डिसेंबर रोजीच्या शासन निर्णयाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 जाहीर केली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सहकार विभागाच्या प्रधान सचिवांनी मार्गदर्शक सूचनाही निर्गमित केल्या आहेत. या योजनेंतर्गत राष्ट्रीयकृत बँका, व्यापारी बँका, ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थामधील ज्या शेतकऱ्यांकडील 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 पर्यंत उचल केलेल्या 1 किंवा एकापेक्षा जास्त कर्ज खात्यात अल्प मुदत पीक कर्जाची 30 सप्टेबर 2019 रोजी मुद्दल व व्याजासह थकीत व परत फेड न झालेली रक्कम 2 लाखापर्यंत आहे, अशा शेतकऱ्यांच्या कर्जांच्या कर्ज खात्यात 2 लाखांपर्यंत कर्ज मुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे.
या योजनेच्या लाभाकरिता लाभार्थी शेतकऱ्यांचे कर्ज खाते त्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न असणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक बँकेकडे नोंदविलेला नाही अशा शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक आपले कर्ज खाते असलेल्या बँक शाखा, विकास सेवा सहकारी संस्थेकडे त्वरित नोंदवून आपल्या कर्ज खात्याशी संलग्न करुन घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्हा उप निबंधक सहकारी संस्था, 204 न्यू शाहूपुरी भू विकास बँक इमारत, तिसरा मजला, हॉटेल पर्ल जवळ, दूरध्वनी क्रमांक 0231-2656258 येथे संपर्क साधावा.