कोल्हापूर : संसदेत नागरिकत्व संशोधन विधेयक हे मोठ्या बहुमताने मंजूर होऊन त्याचे कायद्यात रूपांतर झाले आहे. नागरिकता संशोधन कायद्यास १२ डिसेंबर २०१९ रोजी देशाचे राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली.
या कायद्याबाबत लोकांच्यामध्ये जनजागृती व्हावी म्हणून भारतीय जनता पार्टीच्यावतीने संपूर्ण देशभरात ५ जानेवारी पासून “घर-घर संपर्क” अभियानाची सुरवात झाली आहे. नागरिकता संशोधन कायद्याबाबत भाजपा कार्यकर्त्यांनी प्रबोधन करावे, असे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून राज्यसभा खासदार अमर साबळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या कायद्याचे महत्त्व, व्यापकता, तसेच हा कायदा नेमका कोणत्या नागरिकांच्यासाठी आहे याचे स्पष्टीकरण सोप्या भाषेत लोकांच्या समोर मांडण्यासाठी भारतीय जनता पार्टी कोल्हापूर च्यावतीने दिनांक १२ रोजी बिंदू चौक येथे सकाळी १० वाजता जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, प.म.देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली “घर-घर संपर्क” अभियान राबवण्यात येणार आहे. बिंदू चौक ते लक्ष्मीपुरी गणेश मंदिर, कोंडाओळ चौक परिसरातील प्रमुख मार्गावर प्राथमिक स्वरूपात या अभियानाची सुरवात होत आहे.
यानंतर भारतीय जनता पार्टीच्यावतीने सात मंडलांच्या माध्यमातून नागरिकता संशोधन विधेयक (CAA) बाबत जनजागृती करण्यात येणार आहेत. भाजपा कार्यकर्ते माहितिपत्रकाच्या माध्यमातून समाज प्रबोधनासाठी घरोघरी संपर्क साधून, लोकांच्या मनातील शंका, गैरसमज दूर करून जनजागृती करणार आहेत. या नागरिकता संशोधन विधेयकाच्या समर्थनासाठी #IndiaSupportsCAA वर टृीट करायचे असून 88662 88662 या टोल फ्री नंबर वर मिस कॉल द्यायचा आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना पोस्ट कार्डद्वारे त्यांच्या शब्दात धन्यवाद पत्र लिहिता येणार आहेत.
तरी कोल्हापूर मधील राष्ट्रप्रेमी नागरिकांनी दि.१२ रोजी या कायद्याच्या समर्थनार्थ जनजागृती अभियानात सामील घेण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी केले आहे.