कोल्हापूर /प्रतिनिधी
मूळ आदिवासी अनुसूचित जाती जमातींच्या लोकांना महादेव कोळी जमातीचे दाखले मिळावेत,मालकी हक्काच्या जमीनीवर महादेव कोळी ३६-३६ (अ )च्या नोंदी करून द्याव्यात ,जात पडताळणी नि:पक्षपाती पणे करण्यात येवून या समितीवर निवृत्त न्यायाधीशांची निवड करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसह आदिवासी महादेव कोळी ,टोकरे कोळी, कोळी ढोर,कोळी मल्हार व डोंगर कोळी या अनुसूचित जमातींची जाणीवपूर्वक सुरू असलेल्या फसवणूकी विरोधात अखिल भारतीय कोल्हापूर जिल्हा कोळी समाजाच्या वतीनं दिं.१६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय कोळी समाज जिल्हाध्यक्ष प्रा.बसवंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्य शासनाच्या २१ डिसेंबर २०१९.च्या शासन निर्णयामुळे बोगस आदिवासी नावाखाली मूळ खऱ्या आदीवासींना संपवण्याचं काम सुरू आहे.भारतीय संविधानातील अनुच्छेद ३४२(२) नुसार आदीवासींवर कायदे करण्याचे अधिकार संसदेला असताना विस्तारीत क्षेत्रातील आदीवासींना सरसकट बोगस घोषित करून आदिवासी कर्मचाऱ्यांना पदमुक्त करण्याचा निर्णय म्हणजे मानवी मूल्यांची हत्या आहे. त्यामुळं मूळ आदिवासी महादेव कोळी समाजातील लोकं जातींच्या दाखल्यांसह अन्य सुविधांचा लाभ घेण्यापासून वंचित राहत आहेत. याच्या निषेधार्थ २१ डिसेंबर २०१९ च्या शासन निर्णया विरोधात कोल्हापूर जिल्हा कोळी समाज विकास मंडळ, युनायटेड ट्राइब्ज आॅफ महाराष्ट्र, अखिल भारतीय कोळी समाज ,चंदगड तालुका आदिवासी महादेव कोळी समाज यांच्या संयुक्त विद्यामाने दिं.१६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश महामोर्चा काढण्यात येणार असल्याच जिल्हाध्यक्ष प्रा.बसवंत पाटील यांनी यावेळी सांगितलं.तर जातपडताळणी समिती अवैध असून समितीची कार्यपध्दती पक्षपाती आहे.दरम्यान राज्यातील २२आमदारांच्या दबावाखाली जातपडताळणी समिती कार्यरत असून संविधानाचे उल्लंघन करत मूळ आदिवासी महादेव कोळी समाजाचे दावे फेटाळण्याचं काम करत असल्याचा आरोप ही प्रा.बसवंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केलायं.तर मूळ आदिवासी महादेव कोळी समाजाच्या न्याय मागण्यांसाठी १६ जानेवारीच्या महामोर्चात जिल्ह्यातील आदिवासी महादेव कोळी समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन यावेळी अखिल भारतीय कोल्हापूर जिल्हा कोळी समाजाच्या वतीनं करण्यात आलयं.
पत्रकार परिषदेला प्रा.विजयकुमार मुत्नाळे,दत्तात्रय कोळी, राजेंद्र कोळी, तेजस कोळी उपस्थित होते.