कोल्हापूर/प्रतिनिधी
हेरे सरंजाम जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करण्यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कालबध्द कार्यक्रम निश्चित केला आहे. या कामासाठी 8 उपजिल्हाधिकारी व 96 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
या सर्व कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सर्व संबंधित उपजिल्हाधिकारी तथा पथक प्रमुखांची विशेष बैठक 24 जानेवारी 2020 रोजी सायं. 5 वाजता शाहूजी सभागृह,जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे आयोजित केली आहे.
चंदगड तालुक्यातील 47 हजार एकर हेरे सरंजाम जमिनी शेतीप्रयोजनार्थ भोगवटदार वर्ग 1 म्हणून नोंदी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गडहिंग्लज उपविभागीय अधिकाऱ्यांना यापूर्वीच दिले असून, या जमिनी शेतकऱ्यांच्या नावे करण्यासाठी कालबध्द कार्यक्रम तयार केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे 18 वर्ष प्रलंबित असणारी अंमलबजावणी मार्गी लागली असून चंदगड तालुक्यातील 47 गावातील 22 हजार हेक्टर क्षेत्राचा लाभ 60 हजार वहीवाटदारांना होणार आहे.
हेरे सरंजाम जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करण्यासाठी निश्चित केलेल्या कालबध्द कार्यक्रमानुसार 8 पथके तैनात केली असून उपजिल्हाधिकारी पथक प्रमुख असून तहसिलदार हे सहाय्यक म्हणून काम करणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देशीत केलेले पथकप्रमुख आणि गावे पुढीलप्रमाणे आहेत. पथक क्र. 1 मध्ये उपविभागीय अधिकारी राधानगरी श्रीराम हरी भोसले हे पथक प्रमुख असून यांना नेमून दिलेल्या गावामध्ये कानूर खुर्द, पुंद्रा, सडेगुडवळे, कानुर बु./, धामापूर आणि कुरणी. पथक क्र. 2 मध्ये उपविभागीय अधिकारी भूदरगड डॉ. संपत खिलारी हे पथक प्रमुख असून यांना नेमून दिलेल्या गावामध्ये बिजूर, बुजवडे, इ. म्हाळुंगे, इब्राहिमपूर, गवसे आणि कानडी. पथक क्र. 3 मध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके हे पथक प्रमुख असून यांना नेमून दिलेल्या गावामध्ये अलबादेवी, सत्तेवाडी, पोवाचीवाडी, मौजे शिरगाव, इ. सावर्डे, मजरे शिरगाव आणि कांजिर्णे. पथक क्र. 4 मध्ये महसूल उपजिल्हाधिकारी श्रावण क्षीरसागर हे पथक प्रमुख असून यांना नेमून दिलेल्या गावामध्ये नागनवाडी, कुर्तनवाडी, गंधर्वगड, दाटे, बेळेभाट, वरगाव आणि गुडेवाडी. पथक क्र. 5 मध्ये उपविभागीय अधिकारी गडहिंग्लज विजया पांगारकर ह्या पथक प्रमुख असून यांना नेमून दिलेल्या गावामध्ये तांबुळवाडी, बागीलगे, सातवणे, आसगोळी, केंचेवाडी, केरवडे, वाळकुळी आणि हेरे. पथक क्र. 6 मध्ये उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतिश धुमाळ हे पथक प्रमुख असून यांना नेमून दिलेल्या गावामध्ये आमरोळी, मुगळी, गणुचीवाडी, सोनारवाडी आणि जोगेवाडी. पथक क्र. 7 मध्ये जिल्हा पुनर्वसन अधिकारी तुषार ठोंबरे हे पथक प्रमुख असून यांना नेमून दिलेल्या गावामध्ये अडकुर, बोंजूर्डी, मोरेवाडी, मलगेवाडी आणि विंझणे. पथक क्र. 8 मध्ये उपजिल्हाधिकारी तथा भुसंपादन अधिकारी हेमंत निकम हे पथक प्रमुख असून यांना नेमून दिलेल्या गावामध्ये लाकूरवाडी, शिवगाणी, लक्कीकटटे आणि मोटणवाडी.
मुंबई सरंजाम जहागीर ॲण्ड आदर इनाम्स ऑफ पॉलिटिकल नेचर रिझम्प्शन रूल्स 1952 नुसार जिल्ह्यातील हेरे सरंजाम खालसा करण्यात आले आहे. चंदगड तालुक्यातील 47 गावातील 22 हजार 92 हेक्टर जमिनी (55 हजार 230 एकर) यामध्ये समाविष्ट आहेत. मूळ कब्जेदारांना 1 नोव्हेंबर 1952 पासून नियंत्रीत सत्ता प्रकाराने नवीन व अविभाज्य शर्तीवर पूर्नप्रदान करण्यात आल्या आहेत. मूळ सरंजामदारांना व इतरांना पूर्नप्रदान करण्यात आलेल्या जमिनी वगळून उर्वरित जमिनी वहिवाटदारांना शेतजमीन कमालधारणा कायद्याच्या मर्यादेत नियंत्रीत सत्ता प्रकाराने नवीन व अविभाज्य शर्तीवर देण्याची तरतूद आहे.
त्यानुसार शिल्लक जमीन निर्गतीबाबत ज्या जमिनी नवीन व अविभाज्य शर्तीवर पूर्नप्रदान करण्यात आलेल्या आहेत, अशा जमिनी बेकायदेशीर हस्तांतरण झालेल्या जमिनी 1 नोव्हेंबर 1952 पासून आजपर्यंत जमीन प्रत्यक्षात कसणाऱ्या व्यक्ती, 1952 नंतर अतिक्रमण करून वहिवाटीत असणाऱ्या व्यक्तींकडून शेतसाऱ्याच्या 200 पट नजराना शासनाकडे भरून अशा सर्व जमिनी शेतीप्रयोजनार्थ भोगवटादार वर्ग 1 म्हणून धारण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु, जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी 18 डिसेंबर रोजी हेरे येथे ग्रामस्थांची बैठक घेवून अंमलबजावणीबाबत आढावा घेतला असता कार्यवाही करण्यास अक्षम्य दिरंगाई झाल्याचे निदर्शनास आले. अशा बहुतांशी सर्व जमिनीवर अद्यापही ‘सरकार ‘ हक्क नमूद आहे. यामुळे जमीनधारक व वहिवाटदारांना जमिनीची सुधारणा करणे, कर्ज काढणे, तारण गहाण देणे, वाटप करणे, हस्तांतरण व्यवहार नोंदणे आदी अडचणींना तोंड द्यावे लागत होते.
जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे चंदगड तालुक्यातील हेरे सरंजाम शेतकऱ्यांना यापुढे 7/12 वरील सरकार हक्क कमी होणार आहे. भोगवटादार वर्ग 2 बंधन दूर होणार आहे. वाटणी, पोटहिस्सा, कर्ज, तारणगहाण, हस्तांतरण यासाठी परवानगीची आवश्यकता नाही. यापूर्वी झालेले सर्व विनापरवानगरी हस्तांतरण, शर्तभंग नियमानुकुल होणार. पूर्नप्रदानानंतर शिल्लक क्षेत्र ‘सरकार’ हक्कात येणार. जमीन पूर्नप्रदान व 200पट शेतसार भरल्यानंतर अर्ज मागणी न करता गावातील सर्व जमिनी एकाच आदेशाने संगणकीकरणातील हस्तांतरण बंधनातून मुक्त. खातेदारांना तहसिलदार, उपविभागीय कार्यालयाकडे हेलपाटे मारावे लागणार नाहीत. जिल्ह्यातील हेरे सरंजाम शेतकऱ्यांच्या दृष्टिने हा एक क्रांतीकारी निर्णय असून या शेतकऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांचे कौतुक होत आहे.