कोल्हापूर /प्रतिनिधी
राज्यात अन्न पदार्थांमध्ये भेसळ रोखण्यासाठी विभागाने कठोर पावले उचलावी. औषध निरीक्षकांची रिक्त पदे तातडीने भरावी.अशा सूचना अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आज दिल्या.विधानभवनात राज्यमंत्री श्री.पाटील यांनी विभागाचा आढावा घेतला. यावेळी विभागाच्या आयुक्त पल्लवी दराडे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यातील नागरिकांना भेसळमुक्त दर्जेदार अन्न घटक व पदार्थ मिळाले पाहिजे. जेणेकरुन नागरिकांच्या आरोग्यावर कुठलीही बाधा येणार नाही. अन्न पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी भेसळखोरांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, असे राज्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. राज्यात रस्त्यांवर तसेच छोट्या दुकानातून अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्या सुमारे 7 लाख विक्रेत्यांची नोंदणी झाली असून टप्प्याटप्प्याने त्यांना अन्न सुरक्षा व स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे श्रीमती दराडे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी राज्यमंत्र्यांनी संपूर्ण विभागाचा आढावा घेताना सामान्य नागरिकांचे आरोग्य डोळ्यासमोर ठेवून विभागाने आपली जबाबदारी पार पाडावी, असे सांगितले.