दहावा राष्ट्रीय मतदार दिन; सशक्त लोकशाहीसाठी मतदार साक्षरता
कोल्हापूर/प्रतिनिधी
मतदान करणं ही सुध्दा देशसेवा आहे. लोकशाही वृध्दींगत होण्यासाठी नवमतदारांनी मतदानात नेहमीच उत्साह ठेवावा असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांनी केले.
दहावा राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्ताने आज सकाळी बिंदू चौक येथून रॅलीस प्रारंभ झाला. महापौर वकील सूरमंजिरी लाटकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि महापालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते या रॅलीस हिरवा झेंडा दाखवण्यात आला. तत्पूर्वी उपस्थितांनी राष्ट्रीय मतदार दिवसाची प्रतिज्ञा घेतली. ही रॅली बिंदू चौकातून राजर्षी शाहू स्मारक भवन येथे आली. या ठिकाणी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांचा संदेश दाखवण्यात आला.
याठिकाणी झालेल्या कार्यक्रमात डॉ. शिंदे पुढे म्हणाले, आम्ही भारतीय अशी ओळख आपल्या सर्वांना संविधानाने दिली आहे. संविधान हे धर्मग्रंथ आणि तिरंगा हा धर्मध्वज अबाधित ठेवण्याचे काम लोकशाही करत आहे. मतदान हे आपले कर्तव्य आहे. लोकशाही बळकट करायची असेल तर मतदानाकडे दुर्लक्ष होता कामा नये. मतदान हा राष्ट्रीय सण म्हणून पहावा, असेही ते म्हणाले.
डॉ. कलशेट्टी यांनीही यावेळी, 100 टक्के मतदान झालं पाहीजे असा आज आपण निर्धार करु त्यासाठी मतदारांमध्ये जागृती करु. नोंदणीमध्येही प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, चांगले पुढारी निवडायचे असतील तर आपणही प्रामाणिक रहायला हवे हे समाजाचे चित्र बदलणार नाही तोपर्यंत नेतृत्व बदलणार नाही. त्यासाठी प्रगल्भ लोकशाहीसाठी मतदानातही शैक्षणिक प्रगल्भता असावी. नवमतदारांनी मतदान करताना तुम्हाला हवी असणारे ध्येय धोरणं पाहून कोणत्याही अमिषाला बळी न पडता मतदान करावे. सुरुवातील शाहीर डॉ. आझाद नायकवडी यांनी गायनातून संविधानाची उद्देशिका आणि मतदार जनजागृती पोवाडा सादर केला.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ यांनी प्रास्ताविक केले. ज्येष्ठ मतदार, दिव्यांग मतदार यांचा यावेळी उपस्थित पाहूण्यांनी जागेवर जाऊन सन्मान केला. नवमतदार यांना मतदान ओळखपत्र प्रदान करण्यात आले. चित्रकला स्पर्धेतील मुकबधिर, दिव्यांग, स्पर्धकांना, अंध ब्रेल लिखाण स्पर्धेतील स्पर्धकांना सन्मान चिन्ह प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. निबंध स्पर्धा, वत्कृत्व स्पर्धा, पथनाट्य कलाकार, उत्कृष्ट कर्मचारी या सर्वांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
प्रातांधिकारी वैभव नावडकर यांनी यावेळी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी तसेच प्रभात फेरीमध्ये शहर परिसरातील महाविद्यालयांचे विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, राष्ट्रीय छात्रसेनेचे विद्यार्थी, स्काऊट गाईड पथकाचे विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.