कोल्हापूर/प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनवर वाढलेल्या ताणाची जाणीव ठेवून कोल्हापूर सराफ व्यापारी संघातर्फे गुजरी परिसरामध्ये गस्त वाढविण्यात आली आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढू नये आणि त्याची साखळी तुटावी यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे गुजरी येथील सर्व सराफी दुकानेही गेल्या 22 मार्चपासून बंद आहेत. दरम्यान, त्या दुकानांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही, प्रत्येक दुकानदाराने नेमणूक केलेला सुरक्षा रक्षक अशी सुरक्षा आहेच, त्याशिवाय कोल्हापूर सराफ व्यापारी संघातर्फे 24 तास सहा सुरक्षांच्या मदतीने गस्त घालण्यात येते. त्यामुळे सर्वच व्यावसायिक निश्चिंत मनाने घरी आहेत.
या संदर्भात अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी सांगितले की, पोलिस प्रशासनावर वाढलेला ताण पाहता आपल्या सभासदाची सुरक्षा आपणच केली पाहिजे, या विचारातून सर्वांच्या संमतीने गुजरी येथे सुरक्षा रक्षक नेमण्याचे ठरले. त्यानुसार सहा सुरक्षा रक्षक घाटी दरवाजा, गुजरी, कासार गल्ली, भेंडे गल्ली, खर्डेकर बोळ येथे सुरक्षेचे काम करीत आहेत. त्यासाठी 24 तासासाठी सहा सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली आहे.
याचबरोबर संघाची बैठक होऊन त्यामध्ये सुवर्ण कारागिरांना मदत म्हणून जीवनावश्यक वस्तूंचे कीट लवकरच देण्यार असल्याचे ठरल्याचेही श्री. गायकवाड यांनी सांगितले.