कोल्हापूर दि-25 ( जिमाका ) : खाजगीकरणांतर्गत बांधा वापरा व हस्तांतरित करावयाच्या तत्वावर करण्यात येणा-या कोल्हापूर (शिरोली) ते सागंली रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम या कामाचे ठेकेदार न्यायालयात गेल्यामुळे मागील अनेक वर्षापासून ठप्प होते, राज्य शासन व महाविकास आघाडी सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे हा रस्ता नुकताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे सुपुर्त करण्यात आला असल्याने यापुढे या रस्त्याचे संपूर्ण काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून गतीने होईल अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली, यापूर्वी या रस्त्याचे बीओटी तत्त्वावर काम करणारे ठेकेदार आपल्या देयकासाठी न्यायालयात गेल्यामुळे हे काम खोळंबले होते यानंतर उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री अजितदादा पवार यांच्या मंत्रालयातील दालनात या रस्त्या संदर्भात झालेल्या बैठकीमध्ये ठेकेदारांच्या देयका बाबतीत न्यायालय राज्य शासनावर जी जबाबदारी निश्चित करेल राज्य शासनाकडून ती पूर्ण केली जाईल असे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले व महाराष्ट्रातील बीओटी तत्त्वावर होणारे असे तेरा मार्ग राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणाकडे वर्ग करावेत असे बैठकीत निश्चित झाले होते यानंतर राज्य शासनाने या सर्व रस्त्यांचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणाकडे अटी व शर्तीसह सुपुर्द केला होता. यावर निर्णय होऊन राज्यातील या रस्त्यांपैकी कोल्हापूर शिरोली ते सांगली व हडपसर ते निरा मार्ग हे दोन रस्ते राष्ट्रीय महामार्ग मध्ये सामावून घेतले आहेत अशी माहिती राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली, कोल्हापूर शिरोली सांगली या रस्त्याचे अनेक वर्ष प्रलंबित असलेले मजबुतीकरणाचे हे काम हा संपूर्ण रस्ता राष्ट्रीय महामार्ग जीवन प्राधिकरणाकडे गेल्यामुळे या रस्त्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होऊन रस्ता मजबुतीकरणाच्या गती मिळणार आहे असेही राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शेवटी सांगितले आहे.