कोल्हापूर – कोल्हापूर शहरात प्रवेश करताना जी कमान लागते, त्यावर लावण्यात आलेली मोठी जाहिरात होर्डिंग अखेर काढण्यात आली आहे. कमानीच्या दोन्ही बाजूला लावण्यात आलेल्या मोठ्या होर्डिंगमुळे प्रवेशद्वाराचे विद्रुपीकरण झाले होते. याबाबत सोशल मीडियावर जोरदार टीका सुरू होती. मात्र, अखेर नागरिकांनीच उपस्थित केलेल्या या प्रश्नाला यश आले आहे. कमानीच्या दोन्ही बाजूच्या जाहिराती उतरवण्यात आल्या आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून तावडे हॉटेल येथील ज्या कमानीतून सर्वजण कोल्हापुरात प्रवेश करतात त्या कमानीवर लावण्यात आलेल्या जाहिरात होर्डिंगवरून सोशल मीडियावर टीका व्हायला सुरू झाली होती. सर्वात पहिल्यांदा कोल्हापुरातील काही प्रसिद्ध इन्स्टाग्राम पेजवरून हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. हळूहळू या विषयाने चळवळीचे रूप घेतले आणि बघताबघता अनेकांनी याप्रश्नांकडे लक्ष देऊन कमान जाहिरात मुक्त व्हावी अशी मागणी होऊ लागली. खरंतर कमानीवर जाहिरातीचा फलक मोठा आणि कोल्हापूर महापालिकेचे नाव लहान अक्षरात होते. अनेकजण तर हा मुद्दा उपस्थित करत आमचा जाहिरातीला विरोध नाही, मात्र कमानीवर कोल्हापूरचे हे प्रवेशद्वार आहे हे ठळकपणे मोठ्या अक्षरात दिसले पाहिजे, याबाबत सर्वजण आपली मते व्यक्त करत होती. काहीजण तर या प्रवेशद्वारावर जाहिरातच नको अशा प्रतिक्रिया व्यक्त करत होते. मात्र, शेवटी कोल्हापुरातील या प्रवेशद्वारावरील जाहिरात संबंधितांनी आज सकाळी काढली. त्यामुळे जाहिरातमुक्त प्रवेशद्वार आज सर्वांना पाहायला मिळाले.
दरम्यान, आज सकाळी संबंधितांनी कमानीवरील जाहिरात काढल्या होत्या. मात्र, कमानीवर अजूनही कोल्हापूर महानगरपालिका असे खूप लहान अक्षरात लिहण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी कोल्हापूरच्या प्रवेशद्वरावर राजर्षी छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर करवीर नगरीत सहर्ष स्वागत असा फलक लावला. आज दुपारी दोन वाजता त्यांनी हा फलक लावला. दरम्यान, त्यांचेही सोशल मीडियावर कौतुक होत आहे