गांधीनगर:प्रतिनिधी – श्री. सुभाष विविध कार्यकारी सहकारी(वि)संस्था,सरनोबतवाडी (ता.करवीर) या संस्थेच्या कर्जदार सभासदांना सरसकट दोन लाख रुपये कर्जमाफी द्यावी .जोपर्यत निर्णय होत नाही तोपर्यत संस्थेत कोणत्याही प्रकारचे कामकाज करू नये यासाठी सभासदांनी सेवा संस्थेला टाळे ठोकले.
दरम्यान सभासदांनी संस्थेचे चेअरमन उत्तम आडसूळ ,अमरसिंह सरनोबत (सरकार) ,खंडेराव माने,विश्वास पाटील,राजेंद्र माने व संचालक मंडळाला निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की,महाराष्ट्र् शासनाने ३० सप्टेंबर २०१९ पर्यतच्या थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना दोन लाख पर्यत कर्जमाफी देण्याचे जाहीर केले आहे.पण कर्जमाफीत नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ झाला नाही. नियमित कर्ज फेडणार्या शेतकर्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.नियमित कर्ज फेडणारे सभासद संस्थांना उर्जित अवस्था प्राप्त करून देतात.थकबाकीदार हा शब्द काढून सरसकट नियमित कर्जफेड करणाऱ्या सभासदांना दोन लाख पर्यतची कर्जमाफी द्यावी हा निर्णय जोपर्यत होत नाही तोपर्यत संस्थेचे कामकाज चालू करू नये तसेच शासनाला लागणारी कोणतीही माहिती देऊ नये. सभासदांच्या बाजूने ठोस उपाय योजना होईपर्यत बेमुदत कालावधी करीता संस्थेला टाळे ठोकण्यात आले .
यावेळीसामाजिक कार्यकर्ते किरण आ डसूळ,संभाजी जाधव,अंगद गजबर,सुनीता माने,सुजाता माळी, सदाशिव आडसुळ, आनंदा चव्हाण,दिनकर गजबर,अनिल भोसले,दीपक आडसुळ यांच्यासह ४० शेतकरी सभासद उपस्थित होते.