कोल्हापूर, ३० जून – कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात गेल्या ५ वर्षांपासून
६१३ वाहनांचे मूल्य अल्प दाखवून संगनमताने १ कोटी २३ लाख ३७ सहस्र रुपयांचा कर शासनाच्या तिजोरीत जमा न करता परस्पर हडप केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या रकमेचा कर शासनाकडे जमा केला नसल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाचे अन्वेषण चालू असून याविषयीचा अहवाल येत्या आठवड्याभरात राज्य परिवहन आयुक्ताना देण्यात येणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारीस यांनी दिली.
या संदर्भात प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणाले, ‘‘वाहनांची खरेदी एकाच मासात होत नाही. त्यामुळे वाहनांच्या खरेदीत तफावत असू शकते. याशिवाय वाहनांच्या रंगात पालट झाल्यास त्या वाहनांचे मूल्य अल्प-अधिक होऊ शकते. साधारणपणे वाहनांच्या मूल्यावर १० ते १६ टक् क्यांपर्यंत कर आकारला जातो. हे कार्यालय ३ जिल्ह्यांसाठी असले तरी ठपका असलेल्या ६१३ वाहनांची खरेदी कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांनीच केली आहे आणि ही सर्वच वाहने ४ चाकी आहेत. कर चुकविण्यासाठी वाहनाच्या किमती अल्प दाखवल्या आहेत, असे प्राथमिदृष्ट्या दिसून येत आहे. वाहन विक्रेते अथवा कर्मचारी यात दोषी असतील, तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे.’’