कोल्हापूर, ता. 4 – कोरोनाच्या नियमांचे पालन करून उद्यापासून सराफी दुकानांबरोबर सर्वच दुकाने सुरू करण्याचा निर्धार कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी व्यक्त केला.कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या वतीने आज गुजरी येथे कोपरा सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
ते म्हणाले, गेल्या 90 दिवसांपासून दुकाने बंद आहेत. त्यामुळे फक्त दुकानमालकच नव्हे तर यावर अवलंबून असणाऱ्या सर्वच घटकांसमोर मोठा आर्थिक प्रश्न उभा राहिला आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या कालावधीतील शासनाच्या विविध करांमध्ये सवलत देण्यासाठीही प्रशासन, शासन, मंत्रिमहोदयांकडे वेळोवेळी निवेदनाच्या माध्यमातून मागणी करण्यात आली.
श्री. गायकवाड म्हणाले, राज्यात सर्वच जिल्ह्यात व्यापार-व्यवसाय सुरू होत आहेत, मात्र कोल्हापुरात रुग्ण संख्या वाढ व पॉझिटिव्हिटी रेटच्या कारणाखाली प्रशासनाकडून उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी नाकारली जात आहे. त्यामुळे आज प्रत्येक दुकानदार अस्वस्थ आहे. प्रशासनाला निवेदने देऊनही कोणतीच दखल घेत नसल्याच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतराचे पालन करून उद्योग-व्यवसाय सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत आम्ही सुरू करणार आहोत.
दरम्यान, यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष ललित गांधी, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, सुनील कदम आदीनीही व्यापाऱ्यांना मार्गदर्शन केले आणि कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या या निर्णयाला पाठिंबा दिला.
यावेळी कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे उपाध्यक्ष जितेंद्र राठोड, सचिव अनिल पोतदार, संचालक संजय जैन, प्रीतम ओसवाल, किशोर परमार, प्रसाद कालेकर, तेजस धडाम, सुहास जाधव, ललित गांधी, शिवाजी पाटील, शीतल पोतदार, राजेश राठोड, हेमंत पावसकर, राजू बारस्कर, सत्यजित कदम, किरण नकाते, ईश्वर परमार, नंदकुमार बेलवलकर, शिवनाथ पावसकर, जयेश ओसवाल, महाद्वार रोड व्यापारी संघटनेचे शाम जोशी, गुरुदत्त माडगूड, मनोज बहिरशेट, जयंत गोयानी आदींसह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![कोरोनाच्या नियमांचे पालन करून आजपासून सर्व दुकाने सुरू करणार – गायकवाड](https://i0.wp.com/mirrorkolhapur.in/wp-content/uploads/2021/07/IMG-20210704-WA0133.jpg?fit=1080%2C549&ssl=1)