विद्यापीठात ‘कॅम्पस टू कार्पोरेट कनेक्ट’ उपक्रमाचे उद्घाटन
कोल्हापूर ः प्रतिनिधी-विद्यार्थ्यांना नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. मात्र यासाठी प्रत्येकाने आपली बौद्धीक क्षमता वृद्धींगत केली पाहिजे, असा सल्ला बंगळूर येथील ‘स्मार्ट सोल्युशन’चे संचालक नवीन कुमार दुबे यांनी दिला.
शिवाजी विद्यापीठाच्या प्लेसमेंट सेलच्या वतीने आयोजित ‘कॅम्पस टू कार्पोरेट कनेक्ट’ उपक्रमात ते ‘बुद्धीमत्ता चाचणी’ या विषयावर बोलत होते. या उपक्रमाचा रविवारी ऑनलाईन प्रारंभ झाला. अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक प्रा. डॉ. महादेव देशमुख होते.
यावेळी दुबे म्हणाले, विद्यार्थ्यांनी बौद्धीक जाणीवा विकसित करण्यावर भर देणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारच्या समस्येचे निराकरण कसे होईल, याकडे कटाक्षाने पहावे. कामात आणि निर्णय प्रक्रियेत अचूकता खूप महत्त्वाची आहे. आपण कोणत्या पार्श्वभूमीतून आलो याला आता फारसा अर्थ उरलेला नाही. आपण आपल्या क्षमता किती आणि कशा वाढवतो, याला सध्याच्या काळात सर्वाधिक महत्व आहे. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी इंग्रजी भाषा अवगत असणे अत्यावश्यक आहे. आपण इंग्रजीमध्ये विचार करायला शिकले पाहिजे. इंग्रजी ऐकणे, बोलणे, लिहिण्याबरोबरच इंग्रजीत विचार करण्याने ही भाषा आपल्याला लवकर अवगत होईल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रा. डॉ. देशमुख म्हणाले, शिवाजी विद्यापीठ सातत्याने विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारची कौशल्ये विकसित होण्यासाठी अनेक उपक्रम राबविते. ‘कॅम्पस टू कार्पोरेट कनेक्ट’ या उपक्रमातूनही विद्यार्थ्यांमध्ये कौशल्ये वाढीस मदत होणार आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी ही कौशल्ये विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील.
स्वागत आणि प्रास्ताविक या उपक्रमाचे समन्वयक डॉ. नितीन माळी यांनी केले. विद्यापीठाचे प्लेसमेंट अधिकारी डॉ. जी. एस. राशीनकर यांनी आभार मानले. या ऑनलाईन व्याख्यानाला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.