ग्रीन कॉरिडॉरमार्फत पुण्यातून बेलापूरपर्यंत हृदय फक्त ८३ मिनिटांत पोहोचवले.मुंबईतील रहिवासी, इलेक्ट्रिकल काम करणारे, २९ वर्षांचे श्री. रवी शर्मन अहिरवार यांच्यावर अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई येथे हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली आहे. पुण्यातील एका महिलेचे हृदय त्यांना दान करण्यात आले. या महिलेला २ जुलै २०२१ रोजी मेंदूमध्ये रक्त्तस्राव होऊ लागला. अनेक प्रयत्न करून देखील त्या उपचारांना प्रतिसाद देण्यात असमर्थ ठरल्या आणि त्यामुळे क्लिनिकल नियमांनुसार त्यांना १४ जुलै २०२१ रोजी ब्रेन डेड म्हणून घोषित करण्यात आले. त्यांच्या कुटुंबियांचे समुपदेशन करण्यात आले व त्यांनी अवयव दानाला मनापासून सहमती दर्शवली. या महिलेचे यकृत व हृदय दान करण्यात आले. पुण्यातील एका ६१ वर्षीय रुग्णाच्या शरीरात यकृत प्रत्यारोपण करण्यात आले.
या शस्त्रक्रियेचे प्रमुख डॉक्टर अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई येथील कन्सल्टन्ट, सीव्हीटीएस आणि हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी डॉ. संजीव जाधव यांनी सांगितले की , रवी यांना डायलेटेड कार्डीओमायोपॅथीचा त्रास होत होता . फेब्रुवारी २०२० मध्ये क्लिनिकल नियमांना अनुसरून झेडटीसीसीकडे हृदय प्रत्यारोपणासाठी त्यांची नावनोंदणी करण्यात आली. तब्बल वर्षभर ते प्रतीक्षायादीवर होते आणि त्या काळात त्यांचे हृदय फक्त १५% काम करू शकत होते. झेडटीसीसीमार्फत असे समजले की पुण्यामध्ये एक पात्र दाता उपलब्ध आहे. आम्ही तातडीने याची माहिती रुग्णाला दिली आणि हृदय प्रत्यारोपणासाठी सर्व आवश्यक तयारी केली. सकाळी ८.३० वाजता पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमधून या हृदयाचा प्रवास सुरु झाला आणि ग्रीन कॉरिडॉरच्या मदतीने पुढच्या अवघ्या ८३ मिनिटांत ते बेलापूरमधील अपोलो हॉस्पिटल्समध्ये पोहोचवण्यात आले. १ तास ३० मिनिटांत या हृदयाचे प्रत्यारोपण करण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर आता रुग्ण बरा आहे, आजवर अपोलो हॉस्पिटल्समध्ये ५ हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या आहेत.”
ही शस्त्रक्रिया सीव्हीटीस आणि हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी डॉ संजीव जाधव यांनी केली व त्यांच्यासोबत स्पेशालिस्ट डॉक्टरांची टीम होती, यामध्ये सीव्हीटीएस सर्जन डॉ शांतेश कौशिक, सीव्हीटीएस अँड हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी डॉ सचिन सणगर, सीव्हीटीएस सर्जन डॉ कमल सिंग जोत्तम आणि ऍनेस्थेटिस्टस डॉ हरिदास मुंडे, डॉ सौरभ तिवारी, पर्फ्यूशनिस्ट्स उदय व मेघना आणि प्रशिक्षित ट्रान्सप्लांट नर्सेस व तंत्रज्ञ यांचा समावेश होता.