बाचणी, दि.२१: : *बाचणी ता. कागल येथील जाधव कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असा दिलासा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. मंत्री मुश्रीफ यांनी घरी भेट देऊन या कुटुंबाचे सांत्वन केले व धीर दिला. तसेच नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने त्यांनी कु. भक्ती गौतम जाधव या लहान मुलीसाठी एक लाखांची मदत ही जाहीर केली.
*याबाबत अधिक माहिती अशी, मंगळवारी दि.२० सकाळी दहा वाजता कपडे धुण्यासाठी गेल्यावर अकरा केव्हीउच्च दाबाची वीज वाहिनी अंगावर पडून सौ. गीता गौतम जाधव वय -३२ व कु. हर्षवर्धन गौतम जाधव वय -१२ या मायलेकरांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. थोड्याच अंतरावर असलेली कु. भक्ती ही अवघ्या आठ वर्षांची चिमुकली सुदैवाने बचावली होती.
कुटुंबियांशी बोलताना मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, नियतीनेच घातलेला हा क्रूर घाला आहे. डगमगू नका, चिंता करू नका. तुमच्या कुटुंबियांच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे.*
कालच ही दुर्दैवी घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर मंत्री श्री. मुश्रीफ यांनी भेटून या कुटुंबाचे सांत्वन केले. महावितरणचे अधिकारी श्री. उदगावा यांना फोन करून या कुटुंबाला महावितरणकडून जास्तीत -जास्त मदत मिळवून देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
*यावेळी कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व माजी सरपंच सूर्यकांत पाटील, सरपंच इक्बाल नायकवडी, प्रकाश पाटील, दत्ता पाटील, सुभाष चौगुले आदी प्रमुख उपस्थित होते.*