कोल्हापूर, ता. १० – सराफ व्यापाऱ्यांची शिखर संस्था असणाऱ्या कोल्हापूर सराफ व्यापारी संघाची निवडणूक मोठ्या चुरशीने झाली. यामध्ये ९० टक्के मतदान झाले, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कांतिलाल ओसवाल (केजी) यांनी आज दिली.
सकाळी ८ ते दुपारी ३ या वेळेत सराफ संघाच्या महाद्वार रोड येथील कार्यालयात चौथ्या मजल्यावरील हॉलमध्ये मतदान झाले. यासाठी एकूण ६८४ सभासद पात्र होते. पैकी ६११ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दोन वर्षांसाठी पदाधिकारी निवडीसाठी झालेल्या या निवडणुकीमध्ये एकूण १२ संचालक, एक अध्यक्ष व एक उपाध्यक्षपदासाठी मतदान झाले. विद्यमान अध्यक्ष स्वीकृत संचालक असतील. या वर्षी मारवाडी अध्यक्ष असल्याने अध्यक्षपदासाठी माणिक जैन व राजेश राठोड असे दोन उमेदवार आहेत. उपाध्यक्षपदासाठी विजय हावळ, सुहास जाधव व अनिल पोतदार (हुपरीकर) असे उमेदवार आहेत, तर संचालकांच्या १२ जागांसाठी १८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
दरम्यान, उद्या (ता. ११) सकाळी ९ पासून सराफ संघामध्येच मतमोजणीस सुरवात होईल. प्रथम संचालक मंडळ, त्यानंतर उपाध्यक्ष व शेवटी अध्यक्षपदाची मतमोजणी होणार असल्याचेही श्री. ओसवाल यांनी यावेळी सांगितले. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी ओसवाल यांच्यासह निवडणूक समितीचे विजय वशीकर, जवाहर गांधी, बिपीन परमार, सुरेश गायकवाड, नंदकुमार ओसवाल, कांतिलाल ओसवाल, उमेश जामसांडेकर व हेमंत पावरसकर या सदस्यांनी मदत केली.