कोल्हापूर- डॉ. पंजाबराव देशमुख यांनी शेती, शिक्षण, सहकार व अस्पृश्यता निवारण या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले. त्यांनी कर्मकांडाला व जातीभेदाला विरोध दर्शविला. देवस्थानच्या उत्पन्नाचा उपयोग शिक्षण व आरोग्य यासाठी केला पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली. समाजपरिवर्तनासाठी त्यांनी क्रांतिकारक कृतिशीलता दाखविली. पंजाबराव देशमुख हे फुले-शाहूंचे वैचारिक वारसदार होते असे प्रतिपादन डॉ. अंबादास मोहिते (अमरावती) यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्यावतीने आयोजित फुले शाहू आंबेडकर सप्ताहांतर्गत (डॉ. पंजाबराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त) “डॉ. पंजाबराव देशमुख यांचे समाजपरिवर्तन कार्य” या विषयावर आयोजित व्याख्यानाचे प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्राचे संचालक प्रा डॉ श्रीकृष्ण महाजन हे होते.
डॉ मोहिते पुढे म्हणाले की पंजाबराव देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी निष्ठेने लढा दिला. दिल्लीमध्ये जागतिक कृषी प्रदर्शन त्यांनी भरविले. तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला पूरक असे कार्य त्यांनी केले. जातीभेद नष्ट झाला पाहिजे यासाठी मंदिर प्रवेश आंदोलन चालविले आणि ते यशस्वी केले. शिक्षण सक्तीचे करण्याचे कार्य अत्यंत महत्त्वाचे ठरले.
अध्यक्षीय भाषणात प्रा. महाजन म्हणाले की डॉ. पंजाबराव देशमुख हे कृषक क्रांतीचे जनक होते. समाजपरिवर्तनासाठी त्यांनी केलेले कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांना पूर्व महाराष्ट्राचे कर्मवीर म्हटले पाहिजे. तसेच शेतकरी कर्जमुक्तीचा त्यांचा प्रयोग आजही मार्गदर्शक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना स्वतंत्र मजूर पक्षाच्या प्रथम कार्यकारिणीचे सदस्य म्हणून निवडले होते. तसेच घटना समितीचे सदस्य म्हणून भाऊसाहेबांनी केलेले कार्य महत्त्वपूर्ण ठरले आहे. डॉ. आंबेडकरांनी भाऊसाहेबांचा त्यासाठी गौरवपर उल्लेख केला आहे.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. अमोल मिणचेकर यांनी केले. श्री तेजपाल मोहरेकर यांनी आभार मानले. तर प्रा. अविनाश भाले यांनी सूत्रसंचालन केले.