नियोजित सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवाला दिल्या शुभेच्छा….
कणेरी मठ,:कणेरी ता. करवीर येथील श्री. क्षेत्र सिद्धगिरी मठाचे काम पाहून भारावलो, असे गौरवोद्गार आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी काढले. मठाधिपती श्री. काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी अध्यात्मिक कार्याबरोबरच सेंद्रिय शेती आणि वैद्यकीय सेवा क्षेत्रात केलेले कामही अतुलनीय आहे, असेही ते म्हणाले.
श्री. क्षेत्र सिद्धगिरी मठावर २० ते २६ फेब्रुवारीदरम्यान “सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवाचे” आयोजन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार श्री. मुश्रीफ यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
आमदार श्री. मुश्रीफ म्हणाले, श्री. सिद्धगिरी मठाच्या माध्यमातून श्री. काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी केलेले अध्यात्मिक कार्य गौरवास्पद आहेच. श्री. सिद्धगिरी हॉस्पिटलच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या गोरगरिबांच्या वैद्यकीय सेवेचे कामही कौतुकास्पद आहे. विषमुक्त आहारासाठी या मठाने हाती घेतलेला सेंद्रिय शेती उपक्रम तर राज्यासह देशालाच दिशादर्शी आहे.
यावेळी कागलचे माजी उपनगराध्यक्ष नितीन दिंडे, कणेरीचे लोकनियुक्त सरपंच निशांत पाटील, उपसरपंच वैभव पाटील, अतुल पाटील, एम. बी. पाटील, विजय पाटील, शीतल चिखलव्हाळे आदी प्रमुख उपस्थित होते.