सिद्धार्थनगर पूरसरंक्षक भिंतीच्या कामाचा शुभारंभ, दलित वस्ती सुधारणा योजनेतून रु.२ कोटी ७४ लाखांचा निधी
कोल्हापूर दि.१७ : कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील प्र.क्र.२८ अंतर्गत सिद्धार्थनगर येथे जयंती नदीला सन २०१९ व २०२१ साली आलेल्या महापुराचे पाणी सिद्धार्थनगर मधील नागरी वस्तीत येवून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात प्रापंचिक साहित्याचे, इमारतींचे आर्थिक नुकसान झाले होते. दरवर्षी येणाऱ्या पुराच्या पाण्यात सदर भागातील नागरिकांची घरे बाधित होतात. त्यामुळे या पूरग्रस्त भागात पूर संरक्षक भिंत बांधणे आवश्यक आहे. याबाबतची मागणी भागातील स्थानिक नागरिकांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांना केली होती. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर प्रत्यक्ष जागेची पाहणी करून निधी मागणी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना कोल्हापूर महानगरपालिका अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. शासनाच्या नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेतून सिद्धार्थनगर पूरसरंक्षक भिंत बांधणे या कामास रु.२ कोटी ७४ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शहरातील विविध दलित वस्त्यांमध्ये मुलभूत सोयी सुविधांचा वाणवा असून, आगामी काळात शहरातील दलित वस्त्यांना मुलभूत सोयी सुविधा पुरवण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी केले.
शासनाच्या नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेतून सिद्धार्थनगर पूरसरंक्षक भिंत बांधणे या कामास रु.२ कोटी ७४ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या विकास कामाचा शुभारंभ राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, शहरातील सिद्धार्थनगर परिसर दरवर्षीच्या पुरामध्ये बाधित होतो. स्थानिक रहिवासी नागरिकांचे यामध्ये अतोनात नुकसान होत आहे. यावर उपाययोजना करण्याकरिता आवश्यक जागेची पाहणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना महानगरपालिका प्रशासनास देण्यात आल्या होत्या. त्यानुसार सिद्धार्थनगर येथील लिंगायत स्मशानभूमी जवळील विकी कांबळे यांचे घरापासून सिद्धार्थनगर कमानीलगत शिर्के धट्टी पर्यंत सिद्धार्थनगर कडील बाजूस अंदाजे १०५.०० मी.लांबीची संरक्षक भिंत बांधणे गरजेचे असल्याचा अहवाल कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने सादर केला होता. त्याचे अंदाजपत्रक तयार करून निधी मागणीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्याअनुषंगाने या कामास जिल्हा नियोजन समिती नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेतून या कामास रु.२ कोटी ७४ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याचपद्धतीने कोल्हापूर महानगरपालिका हद्दीत विविध दलित वस्त्यांना मुलभूत सोयी सुविधा पुरवून या भागातील नागरिकांचे राहणीमान उंचावण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगितले.
यावेळी माजी महापौर सौ.सरिता मोरे, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख उदय भोसले, निलेश हंकारे, इंद्रजीत आडगुळे, अल्पसंख्याक सेनेचे रियाज बागवान, उपशहरप्रमुख कपिल नाळे, सम्राट यादव, बिपीन वसगडेकर, सुरेश लिगाडे, सुकुमार सोनी, गणेश कांबळे, अरुण सावंत, सुरक्षा सोनी, रोहित आळवेकर, जितु काळे, आदी भागातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.