नवरात्रौत्सवाच्या चौथ्या दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची कूष्मांडा स्वरुपातील पुजा बांधण्यात आली आहे. श्री दुर्गासप्तशती अंतर्गत श्री ब्रह्मदेव आणि श्री मार्कडेयऋषी यांच्या मधील संवादाप्रमाणे सर्वांचे रक्षण करण्यास समर्थ असे जे देवी कवच आहे, त्यानुसार देवी नऊ नांवांनी प्रसिद्ध आहे. ही नऊ नांवे म्हणजेच नवदुर्गा ह्या नवदुर्गा अनुक्रमे शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री होत. श्री दुर्गमातेच्या चौथ्या रुपाचे नांव कूष्मांडा आहे. तिने आपल्या मंद, प्रसन्न हास्यातून ब्रह्मांड उत्पन्न केले.
ज्यावेळी ब्रह्मांडाचे अस्तित्व नव्हते, सर्वत्र अंधःकार होता तेंव्हा आपल्या ईश्वरी हास्यातून तिने ब्रह्मांडाची रचना केली. अर्थातच हीच ब्रह्मांडाची आदिशक्ती आहे. हिचा निवास सूर्यलोकांत आहे. सूर्यलोकात निवास करण्याची क्षमता आणि सामर्थ्य केवळ हिच्यातच आहे. तिच्या शरीराचे तेज आणि कांती सूर्यासाखी तेजस्वी, दैदीप्यमान आहे आणि यांची बरोबरी कोणताही देव किंवा देवी करू शकत नाही. तिच्या तेज आणि प्रकाशामुळे दाही दिशा प्रकाशित होत आहेत. ब्रम्हांडातील सर्व सजीवांत आणि निर्जीवांत तिचेच तेज आणि चैतन्य भरून राहिलेले आहे.
श्री कुष्मांडा देवी ही अष्टभुजादेवी म्हणूनही प्रसिद्ध आहे. तिच्या सात हातांमध्ये क्रमशः कमंडलू धनुष्य, बाण, कमळ, अमृतकलश, चक्र आणि गदा आहे. आठव्या हातामध्ये सर्व सिद्धि आणि धनसंपत्ती
देणारी जपमाळ आहे. तिचे वाहन सिंह आहे. संस्कृत भाषेत कोहळ्याला कूष्मांड असे म्हणतात. कूष्मांड तिला विशेष आवडतो म्हणूनच नवचंडी, शतचंडी इ. होमहवनांत कोहळ्याचे समर्पण असते. त्यामुळेच तिला कूष्मांडा म्हणतात.